शेतकरी कामगार पक्षाच्या राज्यस्तरीय मध्यवर्ती समितीच्या दोन दिवसीय अधिवेशनास शनिवारी सांगोल्यात सुरुवात झाली. या अधिवेशनामध्ये शेकाप आमदार जयंत पाटील, आमदार धैर्यशील पाटील, आमदार बाळाराम पाटील, राजेंद्र कोरडे, माजी आमदार संपतराव पाटील, चंद्रकांत देशमुख, चिटणीस विठ्ठलराव शिंदे, बाळासाहेब काटकर, पं.स. सभापती राणी कोळवले, उपसभापती नारायण जगताप, डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, ॲड. सचिन देशमुख, सूतगिरणीचे चेअरमन प्रा. नानासाहेब लिगाडे, बाबासाहेब करांडे, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, मारुती बनकर, खरेदी-विक्री संघाचे पी.डी. जाधव, सभापती गिरीश गंगथडे आदी उपस्थित होते.
चिटणीस जयंत पाटील यांनी स्व. माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानिमित्त ठराव मांडल्यानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आ. जयंत पाटील यांनी गेल्या महिन्यापासून शेकाप पक्षाला सक्रिय करून पक्ष संघटनेमध्ये तरुणांचा सहभाग वाढविला आहे. डाव्या पक्षांचे मूल्यमापन करताना अनेक विचारवंतांनी पुस्तके लिहिली आहेत. शेतकरी कामगार पक्षाचा जन्म खऱ्या अर्थाने महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीतून झाला आहे, असे एस. व्ही. जाधव यांनी सांगितले.
या दोन दिवसाच्या अधिवेशनासाठी अलिबाग, पेण, पनवेल, तुळजापूर, लातूर, सांगली, नाशिक, जळगाव, पुणे, कर्जत, पाली, रोहा, अकोला, कोल्हापूर, अमरावती, इगतपुरी, शेगाव, परभणी, पैठण, पिंपरी चिंचवड, मुखेड या भागातून शेतकरी कामगार पक्षाचे २०० पेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित होते. चंद्रकांत देशमुख यांनी आभार मानले.