नारायण चव्हाण / सोलापूरउजनीच्या पाण्यासाठी आक्रमक झालेल्या भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी कर्नाटक हद्दीतील उमराणी बंधाऱ्याचे दरवाजे उचकटण्याचा प्रयत्न केला. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. सोलापुरच्या ३१ शेतकऱ्यांवर चडचण (कर्नाटक) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमानदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील भीमा नदीकाठचे शेतकरी आक्रमक झाले आहेत. शनिवारी सुमारे दोन हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी या मागणीसाठी सोलापूर-विजापूर महामार्ग रोखून धरला होता. शेतकरी सोमवारी मध्यरात्री झुंडीने उमराणी बंधाऱ्यावर चालून गेले. बरुर, हत्तरसंग, चणेगाव आणि अणची या भीमेकाठच्या चार गावांना उजनीच्या पाण्यापासून वंचित ठेवल्याचा राग त्यांच्यात धुमसत होता. पाणी मिळणारच नसेल तर शेती उद्ध्वस्त होणार ही भावना त्यांच्यात प्रबळ झाली. बरुर येथील ५० ते ६० तरुण शेतकऱ्यांनी सोमवारी रात्री उमराणी बंधारा गाठला. मध्यरात्री लोखंडी दरवाजे उचकटण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गोंधळ ऐकून कर्नाटक हद्दीतील शेतकऱ्यांनी बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूने त्यांना घेरले. काही शेतकरी पळून जाण्यात यशस्वी झाले. बरुर व उमराणीच्या शेतकऱ्यांची तुंबळ हाणामारी झाली. बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूने कोंडी करून मोठ्या जमावाने त्यांना दगड, काठ्याने बेदम मारले. रात्रभर ही धुमश्चक्री सुरू होती. पहाटे कर्नाटक पोलिसांना ही माहिती देण्यात आली. नेत्यांची चिथावणीबंधारा फोडण्याचा प्रयत्न केल्याने उमराणीच्या शेतकऱ्यांनी बरुरच्या शेतकऱ्यांवर हल्ला केला. त्यात आ. राजू अलगूर, महादेव बहीरगुंडे या कर्नाटकच्या नेत्यांनी उमराणीच्या शेतकऱ्यांना चिथावणी दिल्याचा आरोप आहे.
महाराष्ट्र-कर्नाटकातील शेतकऱ्यांची धुमश्चक्री
By admin | Published: March 30, 2017 3:47 AM