भीमानगर : उजनी धरणातून इंदापूर तालुक्यासाठी ५ टीएमसी पाणी योजना रद्द करुन तोंडी आश्वासन दिले. आज पाच दिवस झाले तरीही लेखी स्वरूपात आदेश शासन काढत नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे.
उजनी धरण भीमानगर येथे गेटवर जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. शासनाचा निषेध म्हणून सोमवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला व बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. दरम्यान पुतळा जाळल्यानंतर पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी या परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.
शासन पाणी योजना रद्दचा आदेश जोपर्यंत लेखी काढत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करण्यात येणार असल्याचे प्रभाकर भैया देशमुख व संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष सचिन जगताप यांनी सांगितले. यापुढील आंदोलनात अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडले जाईल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.
यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन बापू जगताप, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे, रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. सुहास पाटील, विठ्ठल आबा मस्के,अमोल जगदाळे, सचिन पराडे पाटील, रामदास खराडे, मल्हारी गवळी, प्रशांत महाडिक, धवल पाटील, मंगेश वाघ, दादासो गायकवाड, अतुल भालेराव,अंकुश महाडिक, नारायण गायकवाड, तानाजी गायकवाड, सचिन गायकवाड, गणेश उजगीरे, सिद्धार्थ भास्कर, दत्ता आरकिले, विजयराजे खराडे, संजय नवले, श्रीराम महाडिक उपस्थित होते.
----
जवळपास एक महिना झाला वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने सुरू आहे. उजनी धरणाच्या जिवावर जवळपास ३० कारखाने आहेत. सर्व कारखान्याना जो ऊस मिळतो तो उजनीच्या पाण्यामुळे परंतु अद्याप एकाही कारखान्याच्या चेअरमनने आंदोलनात भाग घेतला नाही अथवा पाठिंबा दिला नाही. यापुढे सर्व कारखान्यांच्या चेअरमनच्या घरांना टाळे ठोक आंदोलन केले जाईल. त्यांचाही निषेध करण्यात येणार आहे.
-
प्रभाकर देशमुख, अध्यक्ष जनहित शेतकरी संघटना