सोलापूर : सिद्धेश्वरांच्या नावाने चालणाऱ्या कारखान्याची चिमणी पाडली. हजारो कुटुंबाच्या रोजंदारीवर गदा आणली. आता आमच्या बाधित शेतीला कवडीमोल दर देऊन रस्त्यावर आणल्यास धडा शिकवू अशी भावना व्यक्त करत अक्कलकोटच्या बाधित शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. घरातील चिमुकल्यांनी आंदोलनस्थळी भाषणे केली. उपोषणस्थळी चूल पेटवून महिलांनी भाकरी थापल्या.
सोलापूर जिल्ह्यातील चार तालुक्यांमधून ग्रीनफिल्ड हायवेचा प्रकल्प होणार आहे. चार लाख प्रतिएकर दर दिल्याने सहा महिन्यांपासून शासनदरबारी संघर्ष समितीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र लोकप्रतिनिधींकडून सहकार्य न मिळाल्याने बाधितांनी सहकुटुंब अक्कलकोट तहसीलदार कार्यालयासमोर शुक्रवारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
यावेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, स्वामीनाथ हरवाळकर, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल वेदपाठक, माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे, प्रियंका दोड्याळे, नागेश नायकोडी, आनंद बुक्कानुवरे, मल्लिकार्जुन पाटील, अशपाक बळोरगी, अॅड. बसवराज होळीकट्टी, परमेश्वर गाडवे, शिवानंद स्वामी, डॉ. विपुल शहा, मुबारक कोरबु, बसवराज अल्लोळी, विकी गाडवे, कालिदास वळसंगे, शाकीर पटेल यांच्यासह बाधित शेतकरी उपस्थित होते. तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांना संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.