मंगळवेढा : शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत व जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अगोदर ऊसदर (एफआरपी) जाहीर करावा व मगच हंगाम सुरू ठेवावा, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान व पीक विमा रक्कम तात्काळ देण्यात यावेत तसेच मागील गळीत हंगामामधील थकीत ऊसबिल न देणाऱ्या साखर कारखान्याच्या संचालकांवर गुन्हे दाखल करावेत, शेतकऱ्यांना त्यांची थकीत ऊसबिले त्वरीत मिळावीत या मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. गुरुवारी मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर माचणूर येथे चक्का जामआंदोलन करण्यात आले.
सन २०२०-२१ गळीत हंगाम सुरू होऊन सुद्धा अद्यापर्यंत उसाचा दर जाहीर केला नाही तरी वाढती महागाई लक्षात घेता एफआरपी अधिक १४ टक्के वाढ ऊसदर जाहीर करावा तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई त्वरित मिळावे, पिक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांचे पैसे देण्यास तात्काळ आदेश द्यावेत त्याचबरोबर शेतकरी विरोधी कायदे माघारी घ्यावेत या सर्व मागण्यांचा विचार करावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
शेतकऱ्यांच्या वरील मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रशासनाकडे व कारखादारांकडे वारंवार पाठपुरावा केला. पाठपुरावा करुन देखील या मागण्यांना यश आलेले नाही. आता संघटना रस्त्यावर उतरली असून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राहुल घुले, श्रीमंत केदार यांनी सांगितले.
यावेळी ॲड. राहुल घुले अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी, तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, दत्तात्रय गणपाटील , शंकर संघशेट्टी, सतीश पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हर्षद डोरले, श्रीकांत पाटील, रोहित भोसले, विजय पाटील, संतोष बिराजदार, आबा खांडेकर, बाळासाहेब घोडके, पांडुरंग बाबर, बाळासाहेब कपले, अप्पू पाटील, राजेंद्र राणे, रेवणसिद्ध नांगरे, रणजितसिंह गवळी, शुभम सावंत यांच्यासह अनेक शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.