सोलापूर : मागील संपूर्ण वर्ष पिण्यासाठी टँकरने पाणी, दुष्काळी मदत व पीक विम्याची नुकसानभरपाई मिळाली नाही, अशी उत्तर तालुक्याची अवस्था असताना शिरापूर उपसा सिंचन योजनेचे वीज बिल भरण्यासाठी पैसे देण्याची शेतकºयांकडे मागणी करीत अधिकाºयांनी पाणीच बंद केले आहे. योजनेच्या कार्यक्षेत्रात २३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यात सध्याही शिरापूर उपसा सिंचन योजनेखालील प्रत्येक गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. उजनी धरण ओसंडून वाहू लागल्याने भीमा-सीना जोडकालव्याला पाणी सोडण्यात आले. हे पाणी शिरापूर बंधाºयापर्यंत आल्यानंतर शिरापूर उपसा सिंचन योजना सुरू करण्यात आली होती. बीबीदारफळ, नान्नज, वडाळा व गावडीदारफळ या गावांच्या शिवारात काहीअंशी पाणी पोहोचले; मात्र मागील काही वर्षांपासून पाऊस नसल्याने जमिनीला भेगा पडल्याने पाणी कोठे गेले हे दिसतही नाही. पाऊस पडला नसल्याने किमान टँकर बंद होण्यासाठी व जनावरांना किमान जानेवारीपर्यंत तरी चारा मिळावा यासाठी तलावात पाणी सोडण्याची मागणी बीबीदारफळ, रानमसले, वडाळा, नान्नज व गावडीदारफळ या ग्रामपंचायतींनी उजनी कालवा विभाग क्र-८ चे कार्यकारी अभियंता रमेश वाडकर यांच्याकडे केली होती.
मात्र उपसा सिंचन योजनेचे वीज बिल कोण भरणार?, शेतकºयांनी पैसे द्यावेत अशी मागणी करीत शिरापूर उपसा सिंचन योजना बंद केली आहे. सध्या पूर्ण क्षमतेने बोगद्यातून सोडलेले पाणी शिरापूर बंधाºयातून खाली वाहत आहे; मात्र वीज बिल शेतकºयांनी भरावे यासाठी अधिकारी नडून बसले व योजनाच बंद केली आहे.
मागील वर्षभर कोणतेही उत्पादन शेतकºयांना आले नाही. दुष्काळी मदत व पीक विम्याची नुकसानभरपाईही उत्तर तालुक्यातील शेतकºयांना मिळाली नाही. अशा अवस्थेत शेतकºयांनी पैसे कोठून भरायचे?, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पाणी नसल्याने शेतकºयांना गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे. कसलेही उत्पादन नसताना पैसे भरा पाणी देतो असे अधिकारी म्हणतात. एखादे पीक येईल किंवा जनावरांना चारा तयार करता येईल एवढे पाणी मिळाले तर शेतकरी पाण्याचे पैसे भरतील.- शिवाजी पाटील अध्यक्ष, तंटामुक्त समिती व शेतकरी
आज शेतकरी व गावकरी संकटात सापडला असल्याने शिरापूर उपसा सिंचन योजनेचा पाणीसाठा करण्याची गरज आहे. सत्ताधारी नेते व प्रशासन पाण्यासाठी गंभीर नाही. उत्तर तालुक्यातील शेतकºयाना पाण्यासाठी स्थलांतरीत होण्याची वेळ येईल.मात्र शिरापूरच्या पाण्याने तलाव भरुन घेतले तर संकट टळेल.- जितेंद्र साठेसंचालक, बाजार समिती, सोलापूर.
संपूर्ण जिल्ह्यातच पाऊस नसल्याने पाण्याची स्थिती बिकट आहे. सीना नदी वाहत असल्याने शिरापूर उपसा सिंचन योजना सुरू ठेवून शक्य तेवढे पाणी साठविण्यासाठी मी पत्र दिले आहे व अधिकाºयांना सूचना दिल्या आहेत.- सुभाष देशमुख सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री