सोलापूर: कांद्याच्या पोत्यावर झोपी गेलेल्या व गोंधळ ऐकून उठून बसलेल्या शेतकºयाला नाहक मारहाण केल्याप्रकरणी फारुक हबीबल्ला बागवान (मोसंबीवाले अँड कंपनी) या अडत्याला सोलापूरबाजार समितीने परवाना रद्द करण्याची कारवाईची नोटीस बजावली. परवाना रद्द करून दुकानाची जागा ताब्यात घेण्यासाठी ठरावही घेण्यात येणार असल्याचे सचिव मोहन निंबाळकर यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद जिल्ह्यातील जागजीच्या रामकृष्ण बाबुराव सावंत यांनी ५० पाकीट कांदा सोलापूर बाजार समितीमध्ये श्री विष्णुनारायण ट्रेडर्स यांच्याकडे आणला होता. रामकृष्ण सावंत हे पोत्यावरच झोपले होते. रात्रीच्या वेळी गोंधळ ऐकून रामकृष्ण सावंत हे जागे झाले. जागे झालेल्या रामकृष्ण सावंत यांना इब्राहिम फारुक बागवान यांनी शिवीगाळ व मारहाण करु लागले. रामकृष्ण सावंत हे श्री विष्णुनारायण ट्रेडर्सचे चालक विक्रम पाटील यांच्याकडे तक्रार करू लागल्यानंतर त्यांनाही इब्राहिमने मारहाण केली.
फारुक हबीबल्ला बागवान यांच्या नावे फळे व भाजीपाला विभागातील सी-११ हा गाळा असल्याने व मारहाण करणारा इब्राहिम हा त्यांचा मुलगा असल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. बाजार समितीने दिलेल्या नोटिसीमध्ये आपला मुलगा इब्राहिम यांच्याकडून वारंवार अशा तक्रारी होत असल्याचे म्हटले आहे. यामुळे महाराष्टÑ कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) आपला परवाना रद्द करुन गाळा ताब्यात का घेऊ नये? असे नोटिसीमध्ये म्हटले आहे. याबाबत बाजार समिती संचालक मंडळाच्या बैठकीत परवाना रद्द व गाळा ताब्यात घेण्याची कारवाई करण्यासाठी विषय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
रामकृष्ण सावंतांचा कांदा नं.१- मारहाण झालेल्या जागजीच्या रामकृष्ण सावंत या शेतकºयाचा कांदा १४०० रुपयाने विक्री झाला. सोमवारी सोलापूर बाजार समितीमध्ये विक्री झालेल्या एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल १४०० ते १५०० रुपयांचा दर मिळाला. यात राम सावंतांचाही कांदा नंबर-१ होता. चांगला कांदा उत्पादनासाठी कष्ट घेणाºया शेतकºयाला त्रास झाल्याचे तेथे शेतकरी बोलत होते.