बाळासाहेब बोचर, ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २२ - दिवाळी सण तोंडावर आला असताना एकाही साखर कारखान्याने दिवाळीचा हप्ता जाहीर केला नाही. जिल्हा बँक कर्ज देण्यास तयार नाही आणि पाऊस पडल्याने नवीन उसाची लागण करण्यासाठी पैशाची चणचण असल्याने ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, राज्यात ऊस उत्पादनात अग्रेसर असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांची दिवाळी यंदा अंधारातच होणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
गतवर्षी पाऊस न झाल्याने उभा ऊस जळून गेला पण दिवाळीअगोदर पाऊस झाल्याने नव्याने ऊस लागवडीसाठी शेतकरी सरसावला आहे. पण हातात पैसा नसल्याने दिवाळी करायची की उसाची लागवड करायची असा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँक सध्या अडचणीत असल्याने बँकेने कर्जवाटप बंद केले आहे. शेतकर्यांची चोहोबाजूने आर्थिक नाकाबंदी झाली असून, अशा परिस्थितीमध्ये शेतकर्यांच्या मदतीला सरकार,साखर कारखाने किंवा बँका आल्या नाही तर ऊस लागवडीवर परिणाम होऊन पुढील वर्षाच्या गळितावरही त्याचा परिणाम होणार आहे. एफआरपी न देणारे साखर कारखाने हे जिल्हा बँकेचे थकबाकीदार असल्याने या कारखान्यांमुळे जिल्हा बँकही अडचणीत आली आहे. जिल्हा बॅँकेने कर्ज बंद केल्याने ग्रामीण भागातील आर्थिक नाड्या थंड झाल्या आहेत. हे आर्थिक दुष्ट चक्र पुढील वर्षाच्या गाळपावर किंवा जिल्ह्यातील साखर उद्योगावर परिणामकारक होऊ शकते. सोलापूर जिल्ह्यातील ३८ साखर कारखान्यांनी गतवर्षी एक कोटी १८ लाख मे.टन. उसाचे गाळप केले आहे. ३८ पैकी ३0 साखर कारखान्यांनी शासन नियमाप्रमाणे एफआरपीची रक्कम ऊस उत्पादकांना अदा केली आहे. उर्वरित आठ साखर कारखान्यांकडे सुमारे ९२ कोटी रुपये शेतकर्यांची एफआरपी थकीत आहे. दिवाळीसाठी दरवर्षी साखर कारखाने एक हप्ता जाहीर करतात पण यंदा अद्याप एकाही कारखान्याने तशी घोषणा केली नाही. उसाचे बिल न मिळाल्याने संतापलेल्या पाच शेतकर्यांनी नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न करून असंतोषाला वाट मोकळी करून दिली होती. तसाच असंतोष जिल्ह्यातील इतर शेतकर्यांमध्येही खदखदत आहे.
सरकारने हस्तक्षेप करावा
राज्यातील मोजक्या जिल्हा बँका सोडल्या तर सर्वच बँका अडचणीत असून सरकारने यावर मार्ग काढला पाहिजे. सरकार राष्ट्रीयीकृत बँकांची कज्रे माफ करते मग जिल्हा बँकांना मदत करण्यात वावगे काय आहे. किमान छोट्या शेतकर्यांना कर्जपुरवठा करण्याइतपत पतपुरवठा जिल्हा बँकांना करणे गरजेचे आहे. अन्यथा साखर कारखानदारीबरोबरच सगळा डोलारा कोसळण्याचे संकट उभे आहे.
- भाई एस. एम. पाटील