सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना जनावरांचे दूध काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्राचे निम्मे अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन व कृषी सभापती अनिल मोटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची बैठक शुक्रवारी आयोजित केली आहे. कृषी विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यासाठी साडेतीन कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. यातील बहुतांश निधी जनावरांच्या लसीकरण व वैरणीच्या बियाणासाठी वापरला जातो. गतवर्षी कोरोना महामारीमुळे कृषी विभागाच्या योजना राबविता आल्या नाहीत. पण यावर्षी शेतकऱ्यांना वैयक्तिक योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.
५० टक्के अनुदानावर अवजारे व इतर साहित्य वाटप करण्यात येणार आहे. या वेळेस नावीन्यपूर्ण योजना घेण्यात आल्या आहेत. ग्रामीणमध्ये पशुपालकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जनावरांचे दूध काढण्यासाठी आधुनिक यंत्रे बाजारात दाखल झाली आहेत. या यंत्रांची किमत ३२ हजारापासून आहे. पण जिल्हा परिषदेने २८ हजाराचे साहित्य खरेदीचे नियोजन केले आहे. यातील निम्मी किमत म्हणजे १४ हजार रुपये अनुदान झेडपी देणार आहे. यापेक्षा जादा किमतीचे साहित्य असेल, तर फरकाची रक्कम लाभार्थ्याला द्यावी लागणार आहे.
शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांनीही २० ते ३० एचपी क्षमतेचे ट्रॅक्टर घेतले आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांसाठी सिंगल, डबल पलटी नांगर, रोटावेअर, पेरणीयंत्र खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे.
कृषी विभाग नावालाच
गेल्या दोन वर्षात झेडपीचा कृषी विभाग नावालाच उरला आहे. कृषी केंद्र परवाने, बऱ्याच योजना राज्य कृषी विभागाकडे गेल्या आहेत. त्यामुळे आता फक्त झेडपीच्या सेस फंडातील तरतुदीवर बोटावर मोजता येतील अशाच योजना सुरू आहेत. पशुसंवर्धन विभागही फक्त लसीकरणासाठी चर्चेत आहे.