संदीप लोनकरश्रीपूर : श्रीपूर (ता. माळशिरस) भागांमध्ये जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने पेरण्या लांबल्या. जुलैअखेर काही प्रमाणात पडलेल्या पावसामुळे कॅनॉल व नदीला पाणी आल्यामुळे शेतातील बोअर व विहिरींच्या पाण्याची पातळी वाढल्याने शेती ओलिताखाली आली आहे. मात्र पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात तण निर्माण झाले आहे.
परिणामी खुरपणाचा खर्च वाढत चाललेला असून मजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी आधीच दुष्काळामुळे होरपळलेला असताना आता मंजुरीमुळे जेरीस आला आहे.
माळशिरस तालुक्यामध्ये जून महिना कोरडा गेला. जुलै-आॅगस्टच्या शेवटच्या टप्प्यात पावसाने हजेरी लावली. पण धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे सर्व धरणे १०० टक्के भरून वाहू लागली.
त्यामुळे तालुक्यात कॅनॉल व नद्यांना पाणी आल्यामुळे पाणीपातळी वाढली आहे. परिणामी हजारो एकर शेती ओलिताखाली आली. ऊस शेती व सर्व पिकांना भरपूर पाणी दिल्याने तर मोठ्या प्रमाणात शेतात तण वाढले आहे. पिकांमधील तण काढण्यासाठी महिला मजुरांची खुरपणीसाठी मनधरणी करावी लागत आहे.
महिला मजुरांना मागणी वाढली- तालुक्यामध्ये यावर्षी पावसामुळे सुरुवातीला लागवड उशिरा करण्यात आली. त्यातच पावसाने जून महिन्यात पाठ फिरवली. यानंतर जुलै महिन्यात शेवटच्या आलेल्या पावसामुळे शेतकºयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. तर नद्यांना पाणी आल्यामुळे बोअर व विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली. यामुळे शेती ओलिताखाली आल्याने शेतात तण वाढले. शेतातील तण काढण्यासाठी खर्चही वाढला. खुरपणासाठी महिला मजुरांची मागणी वाढत आहे. यामुळे मजुरी वाढवून देऊन शेतकरी खुरपणाची कामे करीत आहेत.
अतिरिक्त खर्चात झाली वाढ- पूर्वी गावातून शेतमजूर पायीच चालत शेतात येत होते. मात्र गेल्या काही वर्षात मजुरांच्या वाहतुकीसाठी वाहनांची सुविधा शेतकºयांना उपलब्ध करून द्यावी लागते. त्यासाठी ३०० ते ५०० रुपये प्रती दिवस शेतकºयांना अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.
ठेका पद्धतीने शेतीची खुरपणी- यावर्षी महिला मजुरांची मजुरी शंभर ते दीडशे रुपयांच्या घरात असून त्यांना गावापासून शेतापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहन करावे लागते. त्याच्या वाहतुकीचा अतिरिक्त खर्चही शेतकºयांनाच करावा लागत आहे. महिला मजुरांची टंचाई असल्यामुळे दहा ते पंधरा महिलांची टोळी तयार करून काही महिला ठेका पद्धतीने खुरपणीचे काम घेतात. ते शेतामध्ये तणानुसार एकरी दोन ते चार हजार रुपये घेतात.