सोलापूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत रब्बी हंगाम २०२१-२२ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गहू (बागा), रब्बी ज्वारी (बागा), रब्बी ज्वारी (जिरा.), हरभरा, उ. भुईमूग व र. कांदा या अधिसूचित पिकांसाठी विमा हप्ता भरून सहभाग नोंदविलेला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये एप्रिल २०२२ मध्ये बिगर मोसमी पाऊस पडला आहे. अवकाळी पावसाने अधिसूचित पिकाब्च्या काढणी पश्चात पीक नुकसान झाले असल्यास पीक नुकसानीच्या पूर्वसूचना ७२ तासांच्या आत ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीस सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.
रब्बी हंगाम २०२१-२२ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत कापणी/ काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकाच्या काढणीनंतर दोन आठवड्यांच्या आत (१४ दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगरमोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निकषांच्या आधारे पीक विमा नुकसान भरपाई मिळण्याबाबत तरतूद आहे. काढणी पश्चात नुकसान व स्थानिक आपत्ती या जोखीमअंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्व्हे नंबरनुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲप किंवा संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक/बँक/ कृषी व महसूल विभाग यांना कळविण्यात यावे. नुकसान कळवताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक आहे, असेही कृषी विभागाने कळविले आहे.
--------
अधिक माहितीसाठी कृषी कार्यालयात भेटा...
जिल्ह्यात रब्बी हंगाम २०२१-२२ मध्ये योजना आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स लिमिटेड कंपनीकडून राबविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे कृषी विभागाने कळविले आहे.