महावितरण कंपनीकडून शेती पंपाच्या थकबाकीपोटी सांगोला तालुक्यातील शेतीपंपाचे वीजकनेक्शन कापण्याचा धडाका लावला आहे. या अंनुषगाने धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी खंडित वीजपुरवठ्याविषयी मांडलेल्या गाऱ्हाण्यांची दखल घेत भाजपाचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार यांची भेट घेतली. शेतकऱ्यांना शेतीपंपाची आलेली आव्वाच्यासव्वा बिले, खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान याविषयी सविस्तर चर्चा करून शेतीपंपाचा खंडित वीजपुरवठा तातडीने जोडणी करावा, अशी मागणी त्यांच्याकडे केली.
विद्यार्थ्यांचे होणार शैक्षणिक नुकसान
सध्या दहावी, बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा कालावधी असल्याने घरगुती वीज कापली तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, असेे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तर ग्रामीण भागातील सर्व कुटुंबातील बहुतांशी कामे ही वीज पुरवठ्यावर सुरु आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांना अव्वाच्यासव्वा बिले पाठवली आहेत आणि ती न भरल्यास वीज तोडण्याचा धडाका लावला आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. कोरोनानंतर आता कुठे शेतकरी सावरला जात असल्याच्या भावना चेतनसिंह केदार यांनी उपकार्यकारी अभियंता आनंद पवार यांच्या पुढे व्यक्त केली.