सोलापूर : दिवसा शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यासाठी पुणे प्रादेशिक विभागात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना - २.० अंतर्गत २०३४ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दीष्टे सोलापूर जिल्ह्यासाठी ठरविण्यात आले आहे. यासाठी १० हजार १७० एकर जमिन लागणार आहे. त्यासंदर्भात महावितरणचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना - २.० साठी जमीन भाडेतत्वावर देण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. काहींचे अर्ज मंजूर झाले आहेत तर काहींचे अर्ज नामंजूर झाले आहेत. उर्वरित अर्जावर कारवाई सुरू असून तांत्रिक बाबी तपासण्यात येत आहेत. मंजूर झालेल्याअर्जानुसार ज्या त्या शेतकऱ्यांच्या शेतात सौरऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे. नजीकच्या भविष्यात आवश्यक असलेली जमीन शासन व शेतकरी यांच्याकडून उपलब्ध होणार असल्याने शेती व्यवसायाला मुबलक व शाश्वत सौर वीज मिळणार आहे.
सोलापूर जिल्ह्यासाठी २०३४ मेगावॅट सौर वीज निर्मितीचे उद्दीष्टे साध्य करण्यासाठी १० हजार १७० एकर जमिनीची आवश्यकता आहे. या योजनेनुसार सौर ऊर्जेचा वापर करून डिसेंबर २०२५ पर्यंत सोलापूर जिल्ह्यात किमान ३० टक्के कृषी फीडर्स सौरऊर्जेवर चालविण्याचे उद्दीष्टे ठरविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.