दीपक दुपारगुडे, सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील करकंब व परिसरात पावसाअभावी पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर उजनीच्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी माजी ग्रा.पं.सदस्य सचिन शिंदे यांनी करकंब - नेमतवाडी रोडवर असलेल्या उजनीच्या डाव्या कालव्यावर उपोषण सुरू केले आहे.
करकंब व परिसरावर पावसाळा संपत आला तरी विहिरी, बोअरवेल आटू लागल्या आहेत. अशातच करकंबच्या पाणी पुरवठयाचे प्रमुख साधन असलेल्या डाव्या कालव्या लगत पाच एकर क्षेत्रात असलेला पाणी साठवण तलाव मागील एक महिन्यापासून कोरडा पडला आहे. करकंबकरांवर पाणीटंचाईचे संकट आहे. पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने पाणी सोडण्याचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय आरपीआय, धाडस सामाजिक संघटना, दलित महासंघ, प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना, महाराष्ट्र विकास सेना, अहिल्या फाउंडेशन, करकंब, सरपंच परिषद मुंबई,महाराष्ट्र, संभाजी ब्रिगेड, आम आदमी, मनसे आदी संघटनांनी घेतला आहे.
यावेळी उपसरपंच आदिनाथ देशमुख, सरपंच प्रतिनिधी शरदचंद्र पांढरे, तंटामुक्ती अध्यक्ष अमोल शेळके, प्रा.सतीश देशमुख, अर्जुन शेटे, सुरेश शिंदे, राजू शिंदे, विजय नलवडे, राहुल शिंगटे, बाळासाहेब गुळमे, भीमराव मदने, सावता खारे, सुभाष खारे, विजय शेटे, दिलीप व्यवहारे, ज्योतिराम मदने, सुरय्या आतार, सुनीता देशपांडे आदी उपस्थित होते.