सांगोला तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीच्या ५३९ जागेसाठी २६५ केंद्रावर शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता मतदानास सुरळीत सुरुवात झाली. सकाळी सर्वच मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी होती. मात्र सकाळी ९नंतर मतदान केंद्रावर गर्दी होण्यास सुरुवात झाली. आघाडी, पॅनल प्रमुखांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आपापल्या प्रभागातील मतदारांना दुचाकी, चारचाकी वाहनातून थेट मतदान केंद्रापर्यंत आणून सोडत होते. यावेळी केंद्राच्या परिसरात उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवार कार्यकर्ते यांच्यात मतदानावरून बाचा-बाची, अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडत होते. बंदोबस्तावरील पोलीस, होमगार्ड, कार्यकर्ते दोन्ही बाजूंच्या उमेदवारांची समजूत काढून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करीत असताना दिसून आले.
दुपारनंतर प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी वाढत चालली होती. आपापल्या प्रभागातील ज्येष्ठ, वृद्ध, आजारी अंध, अपंग महिला पुरुष मतदारांना मिळेल त्या वाहनातून, पाठीवरून उचलून थेट मतदान केंद्रात नेऊन मतदान करून घेत होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (आय) यांच्या महाविकास आघाडी प्रतिस्पर्धी शेकापसह स्थानिक विकास आघाडी यांच्या कार्यकर्त्यांत मतदानासाठी चुरस पाहायला मिळाली.
निवडणुकीच्या ५६ गावांत दोन्हीही पार्टीच्या उमेदवारांनी बाहेरगावी असलेले मतदान खासगी, एसटी आदी वाहनांची सोय केली होती. ग्रामपंचायत निवडणुकीच्या आनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रेय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले.
अधिकाऱ्यांनी भेटी घेऊन मतदानाचा घेतला आढावा
तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींसाठी २६५ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू होते. तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित पाटील, निवासी नायब तहसीलदार किशोर बडवे, गटविकास अधिकारी संतोष राऊत, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह भरारी पथकाच्या अधिकाऱ्यानी संवेदनशील मतदान केंद्रांसह विविध मतदान केंद्रांवर भेटी देऊन आढावा घेतला. जवळा येथील प्रतिष्ठेच्या व संवेदनशील ग्रामपंचायतीसाठी चुरशीचे मतदान होत असल्याने अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी भेट देऊन मतदानाचा आढावा घेतला.
फोटो ओळ :::::::::::::::::
१५पंड०६
महुद बु. (ता. सांगोला) येथील श्री शिवाजी विद्यालय येथील प्रभाग क्र. ६ मतदान केंद्रावर महिला व पुरुष मतदारांनी रांगेतून मतदान केल्याचे छायाचित्र.