अपघातातील महिलेसह दोन अल्पवयीन मुलींना पुढील उपचारासाठी पंढरपूरला हलविले असून, महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात मंगळवारी सायंकाळी ६च्या सुमारास सांगोला-पंढरपूररोडवरील बिलेवाडी पाटीनजीक घडला. राजेंद्र निवृत्ती शेटे (४०) व स्वरा राजेंद्र शेटे (४) (दोघेही रा. विजापूर गल्ली, पंढरपूर) असे मृतांची नावे आहेत. अर्चना राजेंद्र शेटे, समृद्धी राजेंद्र शेटे, नंदिनी राजेंद्र शेटे जखमींची नावे असून, कारमधील दोघा जखमींची नावे समजू शकली नाहीत.
पंढरपुरातील विजापूर गल्ली येथील राजेंद्र निवृत्ती शेटे व अर्चना राजेंद्र शेटे हे पती-पत्नी मुली समृद्धी, नंदिनी व स्वरा असे पाच जण मिळून मंगळवारी सकाळी पंढरपूर येथून एमएच १२ डीके ४२४९ या दुचाकीवरून (हणमंतगाव ता. सांगोला) येथील आई सुभद्रा निवृत्ती शेटे व बहीण रेखा ज्योतिराम काळे यांना भेटण्यासाठी गेले होते. तेथून आईला भेटून बहिणीचा पाहुणचार घेऊन राजेंद्र शेटे कुटुंब सायंकाळी ५च्या सुमारास हणमंतगाव येथून सांगोलामार्गे पंढरपूरला येत होते. त्यांची दुचाकी बिलेवाडी पाटीलनजीक आली असता एमएच १० सीएक्स ३८१ ही कार पंढरपूरकडून भरधाव येणाऱ्या एमएच १० एडब्ल्यू ७६४२ या आयशर टेम्पोला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा तिहेरी अपघात झाला. यामध्ये राजेंद्र शेटे व स्वरा शेटे हे दोघे वडील, मुलगी जखमी होऊन जागीच ठार झाले. अर्चना शेटे, समृद्धी शेटे व नंदिनी शेटे या तिघी मायलेकी गंभीर जखमी झाल्या. कारमधील जखमी चालक व मालकाचे नाव समजू शकले नाही. नगरसेवक सतीश सावंत यांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. मृत व जखमींना पोलीस नाईक तुकाराम व्हरे, हवालदार सुरेश कांबळे व बामणी येथील ठेकेदार श्रीनिवास साळुंखे यांनी स्वतःच्या वाहनातून तत्काळ उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करून मदत केली. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.