टेंभुर्णी : माढा तालुक्यातील उपळवाटे येथील एका राहत्या घरावर छापा टाकून टेंभुर्णी पोलिसांनी सुमारे ४ लाख ९२ हजार रुपये किंमतीचा गुटखा व तो तयार करण्यासाठी लागणारे ३ लाख १३ हजार रुपये किंमतीचे साहित्य असा एकूण ८ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पिता - पुत्रास अटक केली आहे. ही कारवाई पोलिस निरिक्षक दयानंद गावडे व सपोनि राजेंद्र मगदूम यांच्या पथकाने शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास केली आहे.
कोणत्याही परवान्याविना अवैधरित्या नबाब ब्रँडचा गुटखा घरातच तयार करणाऱ्या पोपट काशिनाथ भोसले (वय ४७) व त्याचा मुलगा शंकर पोपट भोसले (वय१९) रा. उपळवाटे (तालुका माढा) येथील पिता पुत्रांना टेंभुर्णी पोलिसांनी रंगेहात पकडून मुद्देमालासह अटक केली आहे .या प्रकरणामध्ये निमगाव (टें) येथील चंद्रकांत ज्योतीराम क्षारसागर यांचाही सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की टेंभुर्णी पोलिसांना उपळवाटे येथील एका राहत्या घरातच गुटखा तयार करत असल्याची खबर मिळाली होती .खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोनि दयानंद गावडे व सपोनी राजेंद्र मगदूम यांच्या पथकाने पंचांसह शनिवारी सकाळी ८.५० वा. उपळवाटे येथील पोपट भोसले यांच्या घरावर छापा टाकला. पंचासमक्ष त्यांच्या घराची झडती घेतली असता एका खोलीत वरील मुद्देमाल आढळून आला. यावेळी पोपट भोसले याने सांगितले की हा सर्व माल निमगाव (टें) येथील चंद्रकांत ज्योतीराम क्षिरसागर यांचा असून त्यांनी आमच्या घरातील एक खोली दरमहा ५००० हजार रुपये भाड्याने घेतली होती. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास सपोनी राजेंद्र मगदूम हे करीत आहेत .