अकलूज येथील गुरुनगरातील विकास गोपाळ शेंडगे (वय ३९) व अजिंक्य विकास शेंडगे (१३) मृत झालेल्या पिता-पुत्राचे नाव आहे. पत्नी स्वाती विकास शेंडगे व मुलगी अंजली विकास शेंडगे यांसह जयवंत सातव व त्यांचा मुलगा या चौघांना वाचविण्यात मच्छिमार व स्थानिकांना यश आले.
अकलूज येथील मोटार रिवाइंडिंगचा व्यवसाय करणारे विकास शेंडगे हे पत्नी व मुला-मुलीसह केम (ता. करमाळा) येथे नातेवाइकाच्या लग्नसमारंभासाठी रविवारी सकाळी गेले होते. लग्नसमारंभ उरकल्यानंतर वांगी नं. ३ येथील जयवंत सातव या मित्राकडे गेले. सातव, त्यांचा मुलगा व शेंडगे कुटुंबीय गावालगतच असलेल्या भीमानदीच्या पात्रात बोटीतून सैर करण्यासाठी गेले. नदीच्या किनाऱ्यापासून बोट ३०० मीटर अंतरावर गेल्यानंतर सर्वांना सेल्फी काढण्याचा मोह झाला. एकत्रितपणे उभे राहून सेल्फी काढत असताना बोट पाण्यात उलटली व बोटीतील सर्वच जण पाण्यात बुडाले. आरडाओरड केल्यानंतर नदीच्या काठावर असलेले मच्छिमार सुनील भुईटे यांच्यासह स्थानिक युवक विकास वाघमोडे, पोपट सातव, हनुमंत शिंदे, बापू तिपाले यांनी पाण्यात उड्या मारून स्वाती शेंडगे, अंजली शेंडगे, जयवंत सातव, त्यांचा मुलगा यांना पाण्यात बुडताना वाचविले; पण विकास शेंडगे व अजिंंक्य शेंडगे यांचा बुडून मृत्यू झाला. मच्छिमार व स्थानिक युवकांनी दोन तास शोधमोहीम राबवून त्यांचे मृतदेह बाहेर काढले.
नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, मंडल अधिकारी रेवणन्नाथ वळेकर, तलाठी मोहसीन हेड्डे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या नातेवाइकांना कळविले. येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह आणले असून, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.