सोलापूर : मुलीला सासरी सोडण्यासाठी निघालेल्या पित्याच्या कारला टेम्पोची समोरून जोरदार धडक बसली. या अपघातात वडीलांचा जागीच मृत्यू झाला. तर डोक्याला मार लागून मुलगी गंभीर जखमी झाली. तिच्यावर मिरज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सुरेश मारुती बोबलादे (वय ५४, रा. लक्ष्मीदहिवडी, ता. मंगळवेढा) असे मृत पित्याचे नाव असून हा अपघात गुरुवार २९ जून रोजी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास सांगोला - जत रोडवर सोनंद येथे चव्हाण मळा परिसरात घडला. या अपघातात त्यांची मुलगी भक्ती प्रभू संक्रट्टी (वय १९, रा. बाळेगिरी, ता.अथणी, जि.बेळगाव) ही जखमी झाली असून तिच्यावर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातप्रकरणी बोबलादे यांचा मुलगा शुभम सुरेश बोबलादे (रा. लक्ष्मीदहिवडी) याने फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार सुरेश बोबलादे यांची मुलगी भक्ती हिचा २९ मे रोजी बाळगिरी (ता.अथणी) येथील प्रभू संक्रट्टी यांच्याशी विवाह झाला होता. विवाह नंतर मुलगी माहेरी आली होती. तिला सासरी सोडण्यासाठी गुरुवार, २९ जून रोजी दुपारी ३ च्या सुमारास वडील सुरेश बोबलादे हे कार (एम. एच. १३/ बी. एन. ५७६३) घेऊन लक्ष्मी दहिवडी येथून सांगोला मार्गे बाळेगिरीला निघाले होते. त्यांची कार सांगोला-जत रोडवरुन सोनंदजवळील चव्हाण मळा परिसरात आली असता भरधाव वेगातील टेम्पो (एम. एच. १०/ ए. ५९१५) ने समोरून जोराची धडक दिली. अपघातातील टेम्पो रस्त्याच्या कडेला पलटी झाला.
या अपघातात पुढच्या दोन्ही सीटवर बसलेले सुरेश बोबलादे व मुलगी भक्ती हे दोघे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर टेम्पो मालकानेच उपचाराकरिता दोघांना सांगोला येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. सुरेश बोबलादे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.