करमाळा : दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून एका व्यसनी मुलाने वृद्ध पित्याच्या डोक्यात लोखंडी गज घालून खून केल्याची घटना करमाळा तालुक्यात जिंती येथे घडली.
राजाराम मारुती जगताप (वय ७५, रा. जिंती, ता. करमाळा) असे मरण पावलेल्या वयोवद्ध पित्याचे नाव आहे. याप्रकरणी राजाराम यांचा पुतण्या विशाल जनार्धन जगताप यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी अंकुश राजाराम जगताप याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार राजाराम यांना अंकुश नावाचा एकुलता एक मुलगा आहे. त्याला दारूचे व्यसन असून तो मनोरुग्ण आहे.
दारूला पैसे दे म्हणून अंकुशने स्वत:च्या पित्याला २ सप्टेंबरच्या सायंकाळी सहा वाजता शिवीगाळ केली. पैसे दिले नाहीत म्हणून जिवे मारीन अशी धमकी दिली होती. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता विशाल व दुसरा भाऊ चुलत्याला जेवण देण्यासाठी त्यांच्या घरी गेले. त्यावेळी चुलते विव्हळत होते. त्यांच्याकडे विचारपूस केली असता मुलगा अंकुश पहाटे पाच वाजता बाहेरून आला. तो दारू प्यायला पैसे मागत होता. पैसे नसल्याबाबत त्याला समजावून सांगितले होते. तो चिडून जाऊन लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर विशाल यांनी ॲम्ब्युलन्स बोलावली. करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ करत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी संशयित आरोपीस रात्री अटक केली. त्याला शनिवारी करमाळा येथील न्यायालयात न्यायाधीश शिवरात्रे यांच्यापुढे हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली.