सोलापूर : बापरे...सोलापुरात आज कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या १०२ झाली आहे. गुरूवारी दिवसभरात सोलापुरातील जुन्याच ७ हॉटस्पॉट भागात २१ रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह आढळले आहेत. त्यात १४ पुरूष व ८ महिलांचा समावेश आहे अशी माहिती जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी गुरूवारी दिली.
सोलापुरात कोरोनाा रुग्णांची संख््या वरचेवर वाढतच चालल्यामुळे चिंता वाढली आहे. बुधवारी १३ तर गुरूवारी २१ रुग्ण आढळले. विशेष धक्कादायक बाब म्हणजे यात सात ७ ते १२ या वयोगटातील सात मुले आहेत. शहरातील हॉटस्पॉटमध्येच हे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये शास्त्रीनगरमध्ये, उत्तर सदर बझार, कुर्बानहुसेनगर, नईजिंदगी, तेलंगी पाच्छापेठ, शानदार चौक, आणि मोदी या भागातील रुग्ण आहेत.
शास्त्रीनगर, मोदी, नई जिंदगी आणि कुर्बानहुसेनगरात रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहेत. नव्याने आढळलेले हे रुग्ण पूर्वीच्या रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. या ठिकाणी त्यांचे स्वॅब घेतल्यावर पॉझीटीव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना आता उपचारासाठी आयसोलेशनमध्ये हलविण्यात आले आहे.
पाच्छापेठेतील महिलेची दुबार चाचणी
यापूर्वी पॉझीटीव्ह आढळल्याने तेलंगी पाच्छापेठेतील रुग्णांचे १४ दिवस झाल्याने त्यांची दुबार चाचणी घेण्यात आली. यामध्ये ५२ वर्षाच्या महिलेची दुबार चाचणी पॉझीटीव्ह आली आहे. त्यामुळे तिला या नव्या रुग्णांबरोबर पॉझीटीव्ह रुग्ण म्हणून गणना करण्यात आली आहे.
संपर्कातील व्यक्तींना लागण
यापूर्वी पॉझीटीव्ह रुग्ण आळलेल्या ठिकाणच्या व्यक्तींना केगाव येथील निरीक्षण कक्षात दाखल करण्यात आले आहेत. त्यातील १८ व्यक्तींचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. तर एक महिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डातील आहे.
नव्या ठिकाणी उपचार सुरू
कोरोना पॉझीटीव्ह रुग्णाचा आकडा शंभर झाला आहे. यातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण दुबार आहे. अशा ९४ जणांवर उपचार सुरू आहेत. रुग्णांची संख्या वाढल्याने आता होटगीरोडवरील विमा हॉस्पीटल व रेल्वे लाईनमध्यील रेल्वे हॉस्पीटलमध्ये कोरोना रुग्णांना अॅडमिट करून उपचार सुरू करण्यात आले आहेत.