सोलापूर : बहिणीसोबत अनैतिक संबंध असतानाही पुन्हा घरात येऊन पत्नीचा विनयभंग केल्याचा राग मनात धरून कुऱ्हाडीने हात-पाय तोडून दगड खाण मालकाचा खून केला. कुऱ्हाडीसह पोलीस ठाण्यात येऊन खुनाची कबुली देणाऱ्या संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा थरारक प्रकार मंगळवारी रात्री १० वाजता घडला.
शंकर गुंडप्पा लिंबोळे (रा. मड्डी वस्ती शांतीनगर, जुना तुळजापूर नाका) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे, तर नामदेव गजानन चौगुले (रा. मड्डी वस्ती) असे खून झालेल्याचे नाव आहे. शंकर लिंबोळे हा दि.६ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता उठला व शाैचाला गेला होता. दरम्यान, मयत नामदेव चौगुले हा घरात आला व त्याने त्याच्या पत्नीचा विनयभंग केला. शंकर लिंबोळे हा जेव्हा घरी आला तेव्हा त्याच्या पत्नीने घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी नामदेव चौगुले याच्या विरुद्ध तक्रार दिली. मंगळवारी रात्री १० वाजता नामदेव चौगुले हा पुन्हा घरी आला व बाहेरून दरवाजाला लाथा घालू लागला. शंकर लिंबोळे याने दरवाजा उघडला असता बाहेर नामदेव चौगुले होता.
तो तुझ्या पत्नीने काल माझ्याविरुद्ध दिलेली तक्रार मागे घे असे म्हणत शिवीगाळ करीत होता. बहिणीशी अनैतिक संबंध ठेवून पुन्हा पत्नीचीही छेडछाड केली म्हणून राग होता, म्हणून मी घरात गेलो लाकूड तोडायची कुऱ्हाड घेऊन आलो. तेव्हा नामदेव चौगुले पळून जाऊ लागला, त्याचा पाठलाग करीत कुऱ्हाडीने पायावर वार केला. नामदेव चौगुले हा जमिनीवर कोसळला तेव्हा सपासप वार करून दोन हात, दोन्ही पाय तोडले. कंबरेवर व मानेवरही वार केला आणि नामदेव चौगुले याला ठार केले, अशी माहिती शंकर लिंबोळे याने पोलिसांना दिली.
शंकर लिंबोळे हा कुऱ्हाडीसह पोलीस ठाण्यात आल्यानंतर सहायक फौजदार पवार यांनी तत्काळ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांना याची माहिती दिली. त्यांनी लगेच पोलीस ठाणे गाठले तेव्हा शंकर लिंबोळे याने घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी पाेलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी फिर्याद दिली आहे. तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट करीत आहेत.
पाच दिवसांची पोलीस कोठडी
शंकर लिंबोळे याला पोलीस ठाण्यात आल्यानंतर कुऱ्हाड जप्त करून अटक करण्यात आली आहे. त्याला बुधवारी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीशांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.