सोलापूर : उपचार घेऊन घरी परतलेल्या कोरोना रुग्णांची नावे पोर्टलवर तशीच राहिल्याने पोर्टलवर कोरोना रुग्णांची संख्या सहा हजारांवर गेली आहे. त्यामुळे प्रशासकीय नियोजन करताना गाेंधळ उडत आहे. पोर्टलवरील अनावश्यक नावे वगळण्यासाठी जिल्हा प्रशासन उपचार घेऊन घरी परतलेल्या रुग्णांशी संवाद साधत आहे. डिस्चार्ज घेतल्याचे कन्फर्म करूनच संबंधितांची नावे कमी करत आहोत, अशी माहिती कोरोनाचे नोडल अधिकारी भारत वाघमारे यांनी लोकमतला दिली आहे.
रोज किती कोरोना टेस्ट होत आहेत. किती रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. उपचारार्थ कोरोना सेन्टरमध्ये दाखल रुग्णांची संख्या तसेच उपचार घेऊन घरी परतलेल्यांची संख्या इत्यादी सर्व माहिती शासनाच्या पोर्टलवर दैनंदिन अपडेट करणे अपेक्षित आहे. कोरोना प्रतिबंधक नियोजनात बहुतांश मनुष्यबळ गुंतल्याने पोर्टलवर माहिती अपडेट करण्याचे काम मागे पडत आहे. त्यामुळे उपचार घेऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या तशीच आहे. पोर्टलवरील माहिती तशीच राहत असल्याने राज्य सरकारलाही सद्यस्थितीची माहिती मिळेना.
----
स्वतंत्र मनुष्यबळाची नियुक्ती
भारत वाघमारे यांनी सांगितले, घरी परतलेल्या रुग्णांशी संवाद साधण्यासाठी आम्ही स्वतंत्र मनुष्यबळाची नियुक्ती केली आहे. तालुकानिहाय आरोग्य कर्मचारी संबंधितांना फोन करून उपचार पूर्ण झाल्याचे कन्फर्म करत आहेत. यामुळे प्रशासनाला कोरोनाचा अपडेट रोजचा रोज मिळतो. अपडेट माहितीनुसार प्रतिबंधक उपाययोजना करताना प्रशासनाला मदत होते.