दक्षिण सोलापूर : लॉकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन करून शेतात गुपचूप लग्न करणाऱ्या वरपित्याला वळसंग पोलिसांनी अचानक झटका दिला. लग्न मंडपातच ५० हजार रुपये दंडाची पावती हातात देण्यात आली. जागेवर दंड वसूल करण्यात आला.
सोमवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील रामपूर येथील मल्लिकार्जुन महादेव सोनटक्के यांच्या मुलाचे लग्न होते. लग्नाचा मुहूर्त टाळून सोनटक्के यांनी पोलिसांची नजर चुकवण्यासाठी शेतात अक्षता सोहळा ठेवला. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सोहळा सुरू असतानाच वळसंग पोलीस ठाण्याचे पथक लग्नस्थळी पोहोचले. या वेळी तीनशेपेक्षा अधिक वऱ्हाडी मंडळी लग्नासाठी उपस्थित होती.
सोनटक्के कुटुंबीयांनी नियमाचा भंग करीत २५ पेक्षा अधिक माणसे जमवली, या सबबीखाली त्यांना पन्नास हजारांचा दंड करण्यात आला. पावती हातात देऊन जागेवरच दंड वसूल करण्यात आला.
वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वामीराव पाटील, साहाय्यक फौजदार शरणप्पा मेंगाणे, संजय जमादार, हवालदार सूर्यकांत बिराजदार, मंथन सुळे, लक्ष्मण काळजे यांनी ही कारवाई केली.
-----
फोटो ओळी
रामपूर येथे नियमांचा भंग करून शेतात लग्न करणाऱ्या मल्लिकार्जुन सोनटक्के यांच्या हाती ५० हजार रुपये दंडाची पावती देताना स.पो.नि. अतुल भोसले, साहाय्यक फौजदार स्वामीराव पाटील, शरणप्पा मेंगाणे आदी.
----