सोलापूर : शासनातर्फे आलेल्या गारपीट अनुदानाच्या पैशावरून दोन मुलांनी मारहाण करून वडिलांचा खून केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द येथे घडली. भगवान मारुती कांबळे (वय ७२, रा. कामती खुर्द, ता. मोहोळ) असे खून झालेल्या वृद्ध शेतकर्याचे नाव आहे. कामती येथे त्यांची शेतजमीन आहे. त्यांना तीन मुले आहेत. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शासनाने पंचनामे करून शेतकर्यांना भरपाई देण्याची योजना आणली. गारपीट योजनेचे अनुदान भगवान कांबळे यांच्या बँकेतील खात्यावर जमा झाले. अनुदानाचे पैसे आल्याचे समजताच त्यांच्या मुलांमध्ये भांडणे सुरू झाली. २८ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता दत्तात्रय व संजय या दोघांनी भगवान यांना अनुदानाचे पैसे देण्याची मागणी केली. यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला.भगवान यांनी दोघांनाही पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या दत्तात्रय व संजय या दोघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात ढकलून दिल्यावर ते खाली पडल्याने बेशुद्ध झाले. वडील निपचित पडल्यावर दोघांनी पळ काढला. तिसरा मुलगा विजय याने त्यांना उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना ५ जून रोजी दुपारी तीन वाजता ते मरण पावले. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली. या प्रकरणाची सर्व कागदपत्रे कामती पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहेत.
वडिलांचा खून
By admin | Published: June 06, 2014 1:19 AM