रेवणसिद्ध जवळेकर
सोलापूर : मैत्रीच्या मळ्यात राहत असताना एकमेकांच्या सुख-दु:खात समरस होणारे मित्र... त्यातील एखादा अचानक देवाघरी निघून गेला तर त्या मित्राच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. दु:खाचा हा डोंगर मैत्रीच्या मळ्यातील इतर मित्रांनी दूर करत ‘एक हात मदतीचा’ या ग्रुपद्वारे मुलांच्या जीवनात प्रकाश आणताना आपली मैत्री निभावण्याचा प्रयत्न केला आहे. पांडुरंग बाबू एक्कलदेवी यांच्या निधनानंतर मित्रांनी मदतीचा हात देत त्याला खºया अर्थाने श्रद्धांजली वाहिली आहे.
गुरुनानकनगर ते अशोक चौक मार्गावरील नवीन एस. टी. स्टँडसमोर पांडुरंग बाबू एक्कलदेवी यांचा दुचाकी दुरुस्तीचा वर्कशॉप आहे. आठवीपर्यंत शिकलेल्या पांडुरंगच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून आॅटो मेकॅनिक होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. एका ठिकाणी दुचाकी रिपेअरचे धडे गिरवून ४ वर्षांपूर्वी दुर्गा आॅटोमोबाईल्स थाटले. मित्राच्या अडचणीला धावून येण्याची वृत्ती अन् प्रामाणिकपणा यामुळे राजू गरदास, ज्ञानेश्वर यनगंटी, अनिल वईटला, पुंडलिक गाजंगी, विनोद गुडूर हे मित्र दररोज एकमेकांना भेटल्याशिवाय त्यांचा दिवस सुरु व्हायचा नाही, ना रात्र सुरु व्हायची. कधी कुठला मित्र अडचणीत सापडला तर पांडुरंग अवघ्या काही मिनिटांत तेथे हजर व्हायचा.
नेहमी हसता-बोलता हा मित्र आपल्यातून निघून जाईल, याचा कुणालाच अंदाज आला नाही. ११ नोव्हेंबर २०१९ ची पहाट त्याच्यासाठी काळरात्र ठरली. हृदयविकाराच्या झटक्याने आपला मित्र गेल्याचा धक्का मित्रांना त्यांच्या घरच्याइतकाच बसला. त्या धक्क्यातून सावरत आता मित्रांनीच पांडुरंगचे कुटुंब पुन्हा नव्याने उभारण्याचा संकल्प सोडला आहे. बहाद्दूर मित्रमंडळाने पांडुरंगच्या दोन वर्षांचा मुलगा राघव आणि एक वर्षाची वैष्णवी हिच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. विडी वळणाºया पांडुरंगची पत्नी जयश्री यांना मुलांच्या शिक्षणाची वाटणारी चिंताही आता कुठे दूर झाल्याची भावनाही त्यांच्या चेहºयावरुन दिसते आहे. पांडुरंग एक्कलदेवीच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाला गती देण्यासाठी मनोहर कुरापाटी, व्यंकटेश आरकाल आदी मंडळीही प्रयत्नशील आहेत.
‘एक सदस्य- शंभर रुपये’ मदतीस प्रतिसाद- स्व. पांडुरंगचे मित्र राजू गरदास, ज्ञानेश्वर यनगंटी, अनिल वईटला, पुंडलिक गाजंगी, विनोद गुडूर हे पाचही जण सर्वसामान्य घरातले. हे पाचही जण वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीस आहेत. काही जण चादर करखान्यात आहेत. मात्र मित्रासाठी मित्राच्या मुलांच्या भविष्यासाठी एकत्र येत ‘एक हात मदतीचा’ ग्रुप काढला आहे. ग्रुपमध्ये ८५ हून अधिक सदस्य आहेत. प्रत्येक सदस्याने १०० रुपयांची मदत करावी, असे आवाहन ग्रुपने केले असून, कुणी १०० तर कुणी २०० तर कुणी ५०० रुपयांची मदत देऊ केली आहे. आलेली रक्कम राघव आणि वैष्णवीच्या शिक्षणासाठी बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे स्व. पांडुरंगाच्या मित्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पांडुरंग म्हणजे आमच्यासाठी आधारवड होता. मित्रांच्या संकटांना धावून येणारा पांडुरंग आमच्यातून निघून गेला आहे. आता त्याच्या मुलांचे शिक्षण पूर्ण व्हावे, हीच आमची अपेक्षा आहे. ती अपेक्षा पूर्ण होईल, यातच त्याला आमची खरी श्रद्धांजली असेल.-राजू गरदास, मित्र.