सोलापूर : शहर व ग्रामीण पोलीस दलामध्ये सध्या बदल्यांचे वारे वाहत असून गुन्हे शाखेसाठी अनेक जणांनी इच्छा व्यक्त केली असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र दोन्ही ठिकाणांच्या बदल्या पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार आहेत.
शहर पोलीस आयुक्तालय यामध्ये सात पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत बदल्यांबाबत चर्चा केली जात आहे. फौजदार चावडी पोलीस ठाणे, जेलरोड पोलीस ठाणे, सदर बाजार पोलीस ठाणे, विजापूर नाका पोलीस ठाणे, सलगरवस्ती पोलीस ठाणे, जोडभावी पेठ पोलीस ठाणे आणि एमआयडीसी पोलीस ठाणे येथे कार्यरत असणाऱ्या अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी इच्छित ठिकाणी बदली होण्यासाठी पोलीस आयुक्त यांच्याकडे अर्ज केले आहेत. सात पोलीस ठाण्यांपैकी फौजदार चावडी पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे व गुन्हे शाखा या तीन ठिकाणी बदली करण्यात यावी, अशी मागणी अन्य पोलीस ठाण्यांतील बहुतांशी कर्मचाऱ्यांनी केली आहे असे समजते, तर केवळ आठ तासांची ड्युटी करायची आणि घरी जायचं, अशी इच्छा असलेल्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक शाखा व विशेष शाखा येथे बदलीसाठी अर्ज केला आहे. बदल्यांसाठी तीन पोलीस उपायुक्त व दोन सहायक पोलीस आयुक्त यांची समिती असून त्यामध्ये यादी निश्चित केली जाणार आहे. शेवटी अंतिम यादी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासमोर जाणार असून त्यानंतर बदल्या निश्चित होणार आहेत.
ग्रामीण पोलीस दलामध्ये जिल्ह्यातील ११ तालुक्यांत एकूण २५ पोलीस ठाणी आहेत. दोन हजार ४०० पोलीस कर्मचारी कार्यरत असून, ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे, अशांच्या बदल्या होणार आहेत. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पदभार घेतल्यानंतर काही महिन्यांतच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांतील ४० जणांना मुख्यालयामध्ये पाठविले होते. बदलीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांमधील पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन होणार नाही, अशा कर्तबगार कर्मचाऱ्यांची इच्छित ठिकाणी बदली केली जाणार असल्याचे समजते.
शहरात या तीन ठाण्यांना पसंती...
- 0 एमआयडीसी पोलीस ठाण्यात काम करण्याची इच्छा बऱ्याच कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पोलीस स्टेशनची हद्द मोठी आहे शिवाय या भागात कारखानदारी मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामीणच्या सीमेपर्यंत हद्द असल्याने दोन राष्ट्रीय महामार्ग हद्दीमध्ये येतात.
- 0 फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीत शहरातील मध्यवर्ती भाग येतो. टिळक चौक, मधला मारुती, दत्त चौक, नवी पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा मोठ्या बाजारपेठा आहेत.
- 0 गुन्हे शाखा ही तपास कामासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील कोठेही सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर धाड टाकू शकते. आजवरच्या सर्वात मोठ्या कारवाया गुन्हे शाखेने केल्या आहेत.
जिल्ह्यात या तीन ठाण्यांना पसंती
- 0 तालुका पोलीस स्टेशनमध्ये काम करण्यासाठी अनेक कर्मचारी इच्छुक असतात. हद्द ग्रामीणची असली तरी, पोलीस स्टेशन शहराच्या मध्यवर्ती भागात आहे.
- 0 पंढरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पांडुरंगाचे तीर्थस्थान आहे. महाराष्ट्रभरातून लोक दरवर्षी पंढरपुरात येतात. या भागात भीमा व सीना नदी असल्याने वाळू पट्ट्यांचे प्रमाण जास्त आहे.
- 0 स्थानिक गुन्हे शाखा ही ग्रामीण पोलीस दलातील महत्त्वाची भूमिका बजावणारी टीम आहे. गुन्हे उघडकीस आणणे असो किंवा कारवाई, याबाबत स्थानिक गुन्हे शाखा आघाडीवर असते. जिल्ह्यामध्ये कोठेही जाऊन कारवाई करता येते.
या ठाण्यांत? नको रे बाबा...
- 0 शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सलगर वस्ती पोलीस ठाण्यात काम करण्यासाठी कोणी इच्छुक नसल्याचे दिसून येते. हातीमध्ये गुन्हे जास्त नसले तरी, कधी काय गोंधळ उडेल याचा नेम नसतो. त्यामुळे या पोलीस ठाण्याला खूप कमी लोकांची पसंती आहे.
- 0 करमाळा पोलीस ठाण्याची हद्द मोठी असून बहुतांशी भाग हा सोलापूर जिल्ह्याच्या सीमेलगत आहे. या ठिकाणी पोस्टिंग म्हणजे शिक्षा मिळाल्यासारखी असते.
- 0 माळशिरस तालुक्यातील नातेपुते पोलीस स्टेशन लहान आहे, मात्र हेही जिल्ह्याच्या सीमेवर आहे. शिवाय पोलीस स्टेशनमध्ये राजकीय हस्तक्षेप जास्त असतो. त्यामुळे कर्मचारी काम करण्यास इच्छुक नसतात.
शहर व जिल्ह्यात होणार पोलीस कर्मचार्यांच्या बदल्या- २२३५
शहर पोलीस आयुक्तालयअंतर्गत- ९२८
ग्रामीण पोलीस मुख्यालयअंतर्गत-१३०७