बार्शी : नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला अनुकूल काळ असून, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून कार्यकर्त्यांना सर्वतोपरी ताकद देण्याचे काम निश्चितपणे करीन, अशी ग्वाही जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी बार्शी येथील मेळाव्यात दिली. पद्मकृष्ण मंगल कार्यालयात आयोजित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळाव्यात ते बोलत होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हसापुरे हे तालुकानिहाय बैठका घेत असून, बार्शी येथे आढावा बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष जुगल तिवाडी होते. यावेळी शहराध्यक्ष ॲड. जीवनदत्त आरगडे म्हणाले, जुगलकिशोर तिवाडी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीस सामोरे जाणार असल्याचे सांगत दोन्ही गटांतील इच्छुक काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे म्हणाले. व्यासपीठावर तालुका कार्याध्यक्ष तानाजी जगदाळे, आरोग्य विभागाचे जिल्हाध्यक्ष जनाब वहाब, फत्तेखान पठाण, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष वसीम पठाण, सेवादल यंग ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष डॉ. विजय साळुंखे, सोशल मीडिया समन्वयिका ॲड. निवेदिता आरगडे, शहर उपाध्यक्ष नीलेश मांजरे, शहर सरचिटणीस ईश्वर व्हनकळस, महिला शहराध्यक्षा सुनीता गायकवाड, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष निखिल मस्के, विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष केशव मुकटे, तालुका संघटक पांडुरंग खरात आदी पदाधिकारी उपस्थित होते.
---