शीतलकुमार कांबळे
सोलापूर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने जमाव बंदी कलम १४४ लागू केल्याने हातावर पोट असलेल्या असंघटित कामगारांचे काम बंद झाले आहे. बाहेर कोरोनाची भीती... तर काम नसल्याने घरात पोट कसे भरायचे याची धास्ती...असल्याची खंत कामगार व्यक्त करीत आहेत.
दररोजची हजेरी असेल तर कामावर पगार मिळतो, अन्यथा नाही. अशी स्थिती असलेले कामगार सध्या घरात बसून आहेत. बांधकामावर काम करणारे भीमाशंकर मळसिद्ध कदम (वय ४0, रा. न्यू बुधवार पेठ, रामजी चौक, सोलापूर) यांना पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. जेमतेम इयत्ता ९ वीपर्यंत शिक्षण झालेले भीमाशंकर कदम हे गेल्या २0 वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात बिगारीचे काम करतात. ठेकेदारामार्फत मिळेल तेथे काम करणे, आठवड्याला पगार घेणे आणि घर चालविणे ही नेहमीची दिनचर्या आहे. ठेकेदारांनी काम बंद असल्याचे सांगितल्याने भीमाशंकर कदम हे सध्या गेल्या तीन दिवसांपासून घरात बसून आहेत. मोठी मुलगी १३ वर्षांची, दुसरी ११ तर तिसरा मुलगा ९ वर्षांचा आहे. पत्नी धुणी-भांडी करते, मात्र त्याही सध्या घरात बसून आहेत. मालकांनी त्यांनाही कामाला न येण्याचा सल्ला दिला आहे. सध्या भीमाशंकर हे घरात बसून आहेत़ ठेकेदाराला अॅडव्हान्स मागितला, मात्र सध्या पैसे नाहीत, असे सांगितले आहे. हिच स्थिती पुढे आणखी काही दिवस चालली तर पोट भरायचं कसं? हा प्रश्न भीमाशंकर कदम या बांधकाम मजुराला पडला आहे.
दीपक सिद्राम सोनवणे (वय २७,रा. न्यू बुधवार पेठ, रामजी चौक, सोलापूर) हा तरूण दत्त चौकातील एका सायकल दुकानात रिपेअरीच्या कामाला आहे. दररोज २५0 रूपये पगार दुकानात मिळतो. पंधरा दिवसांतून पगार मिळतो़ गेल्या तीन दिवसांपासून काम नाही. पुढे ३१ मार्चपर्यंत हे काम बंद असणार आहे. घरात पत्नी, दोन लहान मुले, अपंग भाऊ, त्याची पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. संपूर्ण परिवार हा दीपक सोनवणे यांच्यावर अवलंबून आहे. काम बंद झाल्यामुळे आता इथून पुढे घर कसे चालवायचे, असा प्रश्न दीपक सोनवणे यांना पडला आहे. उसनवारी करायची म्हटली तरी आता कोणी पैसे देण्यास तयार होत नाहीत. कारण कधी काम सुरू होणार आणि कधी पगार मिळणार, असा प्रश्न इतरांनाही पडत आहे.