गतवर्षी सीना नदीला महापूर आल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर, बिरनाळ, संजवाड, राजूर या नदीकाठच्या गावांना पाण्याचा वेढा पडला होता. तब्बल ५० तास महापुराच्या पाण्याने या गावातील शेतकऱ्यांनी रात्र आणि दिवस जागून काढला होता. गावाच्या बाहेर बघावे तिकडे पाणीच पाणी पसरलेले होते. रात्री कोणत्याही प्रसंगी पाण्याची पातळी वाढू शकते, या भीतीने ग्रामस्थांना ग्रासले होते. त्या महापुराची धास्ती त्यांच्या मनात आजही असल्याचे दिसून आले.
मागील वर्षी भीमा नदी दुथडी भरून वाहत होती. तिने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे कुडलसंगम येथे पाणी पातळी कमालीची वाढली आणि सीना नदीतील पाण्याचा भीमा नदीत प्रवाह थांबला. पाणी पुढे जाण्याऐवजी वडकबाळ पुलापासून आजूबाजूला पसरत राहिले. पन्नास हजार एकरांपेक्षा अधिक पिके पाण्याखाली गेली होती. किमान दीड लाख टन ऊस महापुरानंतर पाण्यासोबत वाहून गेला. आजही सीना नदी काठोकाठ भरून वाहत आहे. पाण्याच्या प्रवाहात सातत्याने वाढ होत आहे.
--------
जनावरे सुरक्षित ठिकाणी
गतवर्षी आलेल्या महापुरात शेकडो जनावरे वाहून गेली. अचानक पूर आल्याने जनावरे शेतात आणि शेतकरी गावात अशी स्थिती निर्माण झाली. त्यांना चारा पाणी करता आला नाही. सलग तीन दिवस जनावरे दावणीला बांधून राहिली. त्यामुळे आज शेतकऱ्यांनी आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्यावर भर दिला आहे. काही ठिकाणी भर रस्त्यावर जनावरे बांधल्याचे चित्र दिसून आले.
-------
बिरनाळ ग्रामस्थांना प्रवाह बदलण्याची भीती
सीना नदीने १९७९ साली आलेल्या महापुरात प्रवाह बदलला होता. बिरनाळ गावापासून वाहणारी ही नदी त्यावेळी शेतकऱ्यांच्या शेताची बांधे तोडून राजूरच्या दिशेने वाहिली. या महापुरानंतर नदीचे पात्र बदलले होते. मात्र गतवर्षी जुन्या नदीपात्रात पाणी आल्याने संपूर्ण सीना - भीमा परिसरातील पिके जलमय झाली. आता पातळी वाढली तर पुन्हा तीच स्थिती निर्माण होण्याची भीती बिरनाळ ग्रामस्थांना वाटते.
---------
शेतातील वस्त्या होत आहेत रिकाम्या
बागायत क्षेत्र वाढले आहे त्यामुळे बहुतेक शेतकरी शेतातील वस्तीवर पक्की घरे बांधून राहण्यास गेले आहेत . नदीकाठच्या गावांतील ४० टक्के घरे रिकामी दिसतात. आता महापुराच्या पाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी आपला मोर्चा पुन्हा गावाकडे वळवला आहे. संसारोपयोगी साहित्यासह शेतातील वस्त्या रिकाम्या करून शेतकऱ्यांनी तूर्तास गावातच राहण्याची तयारी सुरू केली आहे.
---------
मागील वर्षीचा अनुभव खूप भयावह आहे. आम्ही रात्रीची झोप सोडली होती. गाव उंचावर असले तरी घराच्या धाब्यावर उभे राहून आमची पाण्यात बुडालेली शेती पाहताना अश्रूंचा बांधही फुटला होता.
-निसार हमीद अत्तार, शेतकरी, बिरनाळ
(फोटो आहेत)