सोलापूर : कोरोनाच्या ओमायक्रान स्ट्रेनची धास्ती आता सर्वासामान्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. लसीकरणाला तरुणाची गर्दी होत असल्याचे मंगळवारी दाराशा केंद्रावर दिसून आले.
जिल्ह्यात अद्याप २९ टक्के लोकांनी कोरोनाची लस घेतली नसल्याचे दिसून आले आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या ओमायक्रान स्ट्रेनने जगाची चिंता वाढवली आहे. राज्य सरकारने गंभीर दखल घेत निर्बंध लादण्यास सुरूवात केली आहे. पुन्हा मास्कची सक्ती व फिजिकल डिस्टन्सबाबत जागृती करण्यात येत आहे. कोरोनाची लस न घेणाऱ्यांना सरकारी सवलती, पगार बंद व सरकारी कार्यालयात प्रवेश बंदची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे लस न घेणारे सतर्क झाल्याचे दिसत आहे. आतापर्यंत मी आजारी आहे, इंजेक्शनची भीती वाटते, लस घेतल्यावर त्रास होईल अशी कारणे सांगणारे आता लसीकरण केंद्राकडे धाव घेत असल्याचे दिसून आले. २९ नोव्हेंबर रोजी २९ हजार २८२ जणांनी तर ३० नोव्हेंबर रोजी ३७ हजार ५३ जणांनी लस घेतली. यात २९ रोजी पहिला डोस घेणारे ११ हजार तर ३० रोजी १५ हजार ३८३ जण आहेत.
साेलापुरातील दाराशा येथील केंद्राला दुपारी साडेबारा वाजता भेट दिली असता लसीकरणासाठी दोन रांगा लागल्याचे दिसून आले. यात तरुण व महिलांचा मोठा सहभाग दिसून आला. गेल्या तीन दिवसांपासून गर्दी वाढल्याचे येथील आरोग्य अधिकारी डॉ. सुहासिनी वाळवेकर यांनी सांगितले. लसीकरणासाठी हर घर दस्तक मोहीम घेतली होती. मोहिमेचा आज शेवटचा दिवस होता. घरोघरी आरोग्य कर्मचारी गेले पण लोकांनी कारणे सांगितली. यापुढे लस मिळणार नाही असा इशारा दिला होता. अशात नव्या स्ट्रेनची चर्चा सुरू झाली व पगार, शासकीय योजना बंद होणार हे समजताच लोक स्वत:हून येत आहेत.
आजारी होतो म्हणून
मी तीन महिन्यांपूर्वी आजारी होतो. त्यामुळे लस घेतली नव्हती. आता नवा कोरोना आल्याचे सांगण्यात येत आहे. लस घेतल्यावर काहीही होत नाही म्हटल्याने तातडीने पहिला डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर दाखल झालो आहे.
रफिक शेख, लाभार्थी
दररोज काम असल्याने लस घेतलो नव्हतो. पण आता लस घेतली नसेल तर रेशन बंद व इतर ठिकाणी जाताना तपासणी करणार म्हणून पतीसह लस घेण्यासाठी आले आहे. घरातील इतरांनी लस घेतली आहे.
शीतल सगर, लाभार्थी
असे झाले लसीकरण
पहिला डोस: २४२३९८०
दुसरा डोस: ९१०९६९
एकूण: ३३३४९४९
फोटो: दाराशा लसीकरण केंद्रावर लागलेली रांग