सोलापूर : शहरातील एसटी स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, मॉल, बाजारपेठ आदी ठिकाणी पे ॲन्ड पार्कच्या ठिकाणी लावण्यात आलेली वाहने जर चोरीला गेली, तर त्याची जबाबदारी संबंधित मालकांवर राहते. महिनाभर जर गाडी तशीच राहिली, तर ती थेट पोलीस ठाण्यात जमा केली जाते.
दुचाकी मोटारसायकल, रिक्षा व कार यासारखी वाहने पार्क करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी पे ॲन्ड पार्कची सोय करण्यात आली आहे. लावण्यात आलेल्या वाहन मालकाकडून पैसे घेतले जातात आणि वाहनांवर लक्ष ठेवले जाते. एसटी स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन येथे असे पार्किंग उपलब्ध करण्यात आले आहे. आजुबाजूच्या परिसरात खासगी जागेतही असे पार्किंग सुरू करण्यात आले आहे. एक, दोन किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांसाठी जर वाहन लावले गेले, तर १२ व २४ तासासाठी दर आकारला जातो. पे ॲन्ड पार्कच्या ठिकाणी वाहने सुरक्षित व कामगारांच्या निगरानीखाली राहतात. पे ॲन्ड पार्कच्या ठिकाणाहून जर एखादे वाहन चोरीला गेले, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित मालकाची राहते. एक महिन्यापर्यंत वाहन पे ॲन्ड पार्कच्या ठिकाणी राहिले आणि तरीही जर मालक आला नाही, तर मात्र त्याची जबाबदारी मालकाची राहत नाही. बहुतांश मालक एक महिन्यानंतर संबंधित वाहन मालकाला फोन करून कल्पना देतात. जर वाहन नेले नाही, तर ते वाहन सरळ संबंधित पोलीस ठाण्यात जमा केले जाते.
जबाबदारी वाहन मालकाचीच
० शहरातील काही पे ॲन्ड पार्कच्या ठिकाणी पैसे घेऊनही, वाहन चोरीस गेल्यास त्याची जबाबदारी संबंधित मालकाची, असे फलक लावण्यात आले आहेत. हे फलक काही भाजी मंडईच्या ठिकाणी असलेल्या पे ॲन्ड पार्किंगमध्ये लावले आहेत. हे पार्किंग फक्त बाजारपेठ जोपर्यंत सुरू असते, तोपर्यंत पे ॲन्ड पार्किंग असते.
कोठे, किती पार्किंग शुल्क?
- ० एसटी स्टॅन्ड : एसटी स्टॅन्ड परिसरात १, तर बाहेरील बाजूस ३ ते ४ पे ॲन्ड पार्किंग आहेत. पार्किंगवर १२ तासासाठी २० रुपये, २४ तासासाठी ४० रुपये असा दर आकारण्यात आला आहे.
- ० रेल्वे स्थानक : रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेच्या जागेत माेठे पार्किंग आहे. याठिकाणी २४ तासासाठी ३० रुपये दर ठेवण्यात आला आहे. २४ तासानंतर हे दर वाढत जातात. जेवढा वेळ गाडी थांबेल तेवढे पैसे आकारले जातात.
- मॉल : भागवत चित्रमंदिरच्या शेजारी असलेल्या एका मॉलसमोर वाहन पार्किंग करण्यासाठी १० रूपये घेतले जातात. हे पार्किंग सकाळी ९ ते रात्री १२ पर्यंत असते. सिनेमाघर असल्याने रात्री १२ पर्यंत पार्किंग सुरू असते.