सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासनातर्फे काही नियम करण्यात आले आहेत. या नियमांचा फटका हातावर पोट असणाऱ्यांना बसत आहे. गाड्यावरून भजी विक्री करताना लोकांची गर्दी होते. त्यामुळे दंडही होऊ शकतो. याचा विचार करून विजापूररोड येथील एक भजीवाला सायकलवरून भजीची विक्री करत आहे.
ब्रह्मानंद शिंदे हे दोन नंबर झोपडपट्टी येथे राहतात. याच परिसरात त्यांची भजीचा गाडा आहे. दिवसा ४० रुपये भाडे देऊन ते गाड्याचा वापर करतात. भजीची विक्री करत असताना गर्दी झाल्याने त्यांना दंडही भरावा लागला होता. त्यानंतर काही दिवस त्यांनी गाडा बंद केला. पण, रोजचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी पुन्हा भजी विक्री करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी गाडा बंद करून सायकलवरून भजी विक्री करण्यास सुरुवात केली आहे. मागील आठ दिवसांपासून ते सायकलवर फिरून भजी विक्री करताहेत.
मुलगाही बेरोजगार
ब्रह्मानंद शिंदे यांचा मुलगा महेश हा बांधकामाचे काम करतो. लॉकडाऊनच्या नियमामुळे काम मिळत नसल्याने तोही घरी बसून आहे. ब्रह्मानंद शिंदे या गृहिणी असल्यामुळे आर्थिक अडचणी येत आहेत. त्यात भजीचा व्यवसाय बंद झाल्याने त्यांना कर्जही झाले आहे.
तेल, बेसनही महागले
भजी करण्यासाठी तेल आणि बेसनचा वापर होतो. सहा महिन्यांपूर्वी ६० रुपये किलो असलेले बेसन आता ७०च्या पुढे गेले आहे, तर तेल १३५ रुपयांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे भजी तयार करण्याचा खर्च वाढला आहे. गाडा सुरू असताना दिवसा ७०० रुपये कमाई व्हायची, ती आता २०० ते ३०० वर आल्याचे शिंदे यांनी सांगितले.
माझे वय आता ६३ आहे. लॉकडाऊनमुळे या वयात सायकलवर फिरून भजी विक्री करण्याची वेळ आली आहे. गल्ली-बोळामध्ये जाऊन ओरडल्याशिवाय धंदा होत नाही. रात्री १०.३० वाजेपर्यंत भजी विक्री करतो. कोरोनाची भीती बाजूला राहून उपासमारीनेच माझ्यासारख्यांना जास्त त्रास होत आहे. शासनाने लवकर निर्बंध शिथिल करावे.
- ब्रह्मानंद शिंदे, भजीविक्रेता