सोलापूर : जन्मल्यानंतर आईने जगाचा निरोप घेतला. वडिलांचा पत्ता नाही अशा अवस्थेत दत्तक घेतलेल्या जोडप्याने मुलीला वयाच्या १७ व्या वर्षी घरातून हाकलून दिले. जगात आपलं कोणीही नाही काय करायचं या विचाराने शहरातील तरटी नाका येथे आलेल्या मुलीला तेथील देहविक्री करणाºया वारांगणेने क्रांती महिला संघटनेच्या माध्यमातून पोलिसांच्या ताब्यात दिले.
सतरा वर्षांपूर्वी कर्नाटकातील शहाबाद येथील एका सरकारी दवाखान्यामध्ये एका महिलेला मुलगी झाली. मुलगी झाल्याच्या नंतर आईने जगाचा निरोप घेतला, तिच्या वडिलांचा शोध लागला नाही. अक्कलकोटच्या एका दांपत्याला मूलबाळ नव्हते. दांपत्याच्या नातेवाईकांनी हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी तिला दत्तक घेतलं.
सुरुवातीला तिचा लाड झाला; मात्र काही वर्षांनंतर या दांपत्याला मुलं झाली अन् दत्तक मुलीकडे दुर्लक्ष सुरू झाले. शिक्षण बंद करून तिला घरकामात जुंपले. तिला मानसिक छळही दिला. अखेर ती मुलगी १ आॅक्टोबरला सोलापुरात तरटी नाका परिसरात आली. तेथील वारांगणांनी तिची चौकशी करून तिला सुरक्षितपणे क्रांती महिला संघटनेच्या रेणुका जाधव यांच्या ताब्यात दिले. जाधव यांनी पोलिसांच्या मदतीने तिची रवानगी बालसुधारगृहात केली.
तरटी नाक्यावर काय चालते, हे मुलीला माहीत नव्हतं : जाधवदत्तक घेतलेला वडील मोबाईलवर बोलत असताना जाणीवपूर्वक सोलापुरातील तरटी नाका हे ठिकाण खूप चांगलं आहे. तिथे महिला खूप पैसे कमावतात, त्यांची लाईफ खूप चांगली आहे. असेच वारंवार मुद्दाम मुलीसमोर बोलत होता. त्यामुळे ती सोलापुरात आली आणि तरटी नाका याठिकाणी ती गेली; पण तिला हे माहीत नव्हतं की, त्या ठिकाणी नेमकं चालतं काय.? अशी माहिती क्रांती महिला संघटनेच्या अध्यक्षा रेणुका जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.