आप्पासाहेब पाटील
सोलापूर : वार सोमवार... रात्रीचे ८ वाजून ४५ मिनिटे झालेले... स्थळ सोलापूररेल्वे स्थानक प्लॅट फॉर्म क्रमांक १... जोरात हॉर्न वाजला अन् रेल्वे हळूहळू ट्रॅकवरून धावत होती... अशातच उशिरा आलेला एक प्रवासी धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न केला पाय घसरून खाली ट्रॅकवर पडला... स्थानकावरच कर्तव्यावर असलेल्या लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ एक्स्प्रेस थांबविली अन् त्या प्रवाशाला बाहेर काढले... मात्र, पायावरून ट्रेन गेल्याने त्या प्रवाशाला दोन्ही पाय गमवावे लागले, हे मात्र दुर्भाग्यच म्हणावे लागेल.
मेहमुद्दीन इमामसहब (वय ४०, रा. अंबिकानगर, कलबुर्गी) असे जखमी प्रवाशाचे नाव आहे. मेहमुद्दीन हा कलबुर्गीहून सोलापुरात उपचारासाठी आला होता. परत घराकडे जाण्यासाठी तो सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाला. उशिरा पोहोचलेल्या मेहमुद्दीनने धावत्या बसवा एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला; पण तो प्रयत्न असफल होऊन तो ट्रॅकवर खाली पडला. मेहमुद्दीनचे दोन्ही पाय निकामी झाले असून शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मेहमुद्दीन हा बिगारी कामगार असून त्याची घरची परिस्थिती सर्वसाधारण आहे.
----------
२५ मिनिटे थांबली बसवा एक्स्प्रेस...
प्रवासी एक्स्प्रेसमध्ये चढताना पडल्याची घटना घडली. त्या प्रवाशाला बाहेर काढून शासकीय रुग्णालयापर्यंत पोहोचेपर्यंत विजापूरहून मुंबईकडे निघालेली बसवा एक्स्प्रेस सोलापूर रेल्वे स्थानकावर तब्बल २५ मिनिटे थांबविण्यात आली होती. दरम्यान, घटना पाहिलेले काही प्रवासी भयभीत झाले होते.
-------
यशवंत जमादार, दीपक साळवी ठरले देवदूत
प्रवासी ट्रॅकवर पडताच कर्तव्यावर असलेले सोलापूर लोहमार्ग पोलीस दलाचे पोलीस कॉन्स्टेबल यशवंत रामचंद्र जमादार, दीपक अनिल साळवी व स्थानकावरील सफाई कामगार मंगेश शिंदे यांनी धावती ट्रेन थांबवून त्याला ट्रॅकवरून बाहेर काढले. जखमी व रक्ताळलेले पाय घेऊन संबंधित प्रवासाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्यांचे या चांगल्या कामांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
----------
दर पंधरा दिवसाला तो यायचा सोलापूरला
अपघातात जखमी झालेला मेहमुद्दीन हा दरपंधरा ते वीस दिवसाला सोलापुरात एका रुग्णालयात उपचारासाठी येत होता. शिवाय या ठिकाणाहूनच तो आपल्यासाठी लागणारे औषधोपचार घेऊन जात असे. यापूर्वी अनेक वेळा मेहमुद्दीन कलबुर्गीहून सोलापुरात आला होता.
---------
नातेवाइकांची रुग्णालयात गर्दी...
या अपघाताची माहिती लोहमार्ग पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांना मंगळवारी सकाळी मेहमुद्दीनच्या मोबाइलवरून फोन करून दिली. त्यानंतर मंगळवारी तात्काळ नातेवाईक सोलापुरात दाखल झाले. रुग्णालयात मेहमुद्दीनला पाहण्यासाठी त्याच्या नातेवाइकांबरोबर त्याच्या मित्रांनी भेट दिली.
--------
धावत्या बसवा एक्स्प्रेसमध्ये चढताना प्रवासी ट्रॅकवर पडला होता. त्याला आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी वेळेवर दाखल केले. त्याचे पाय निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याची तब्येत ठीक असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस कॉन्स्टेबल जमादार व साळवी यांच्या कामांचे कौतुकच करावे लागेल.
- अमोल गवळी, सहायक पोलीस निरीक्षक, सोलापूर लोहमार्ग पोलीस.