सोलापूर : शहर व जिल्ह्यात अशांतता असतानाही जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या बैठकीला सदस्या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आल्या होत्या. परंतु अधिकारी नसल्याने बैठक घेऊन काय उपयोग, असा प्रश्न विचारत महिला सदस्यांनी बैठकच तहकूब करण्यास भाग पाडले.जिल्हा परिषदेचा अनियंत्रित कारभार असल्याचे यावरुन पुन्हा स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता किमान सोलापूर जिल्हा परिषदेत तरी प्रभावीपणे राबवली जाते आहे. यात पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काहीच नुकसान होत नाही; मात्र सर्वसामान्यांचे नुकसान होत आहे. पदाधिकाऱ्यांना जुमानायचेच नाही, असा अधिकाधिक प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे. असाच प्रकार शिक्षण समितीच्या बैठकीबाबत सोमवारी झाला. सोमवारी शिक्षण समितीची बैठक होणार होती, परंतु जिल्ह्यात सध्या तणाव असल्याने बाहेर पडलेला व्यक्ती सुखरुप घरी पोहोचेलच असे नाही. त्यामुळे घाबऱ्याघुबऱ्या झालेल्या सदस्यांनी अगोदरच बैठक होणार आहे का?, अशी विचारणा करूनच जिल्हा परिषद मुख्यालय गाठले. इथे आल्यानंतर बैठकीला सुरुवात होण्यासाठी नेहमीप्रमाणे वेळच लागला. हे आले नाहीत, ते इथंपर्यंत आलेत, ते थोड्याच वेळात पोहोचणार आहेत, असे सांगत काही वेळ गेल्यानंतर बैठकीला सुरुवात केली. परंतु शिक्षणाधिकारी राजेंद्र बाबर यांच्यासह चार तालुक्याचे गटविकास अधिकारी बैठकीला नव्हते. शिक्षणाधिकारीच नसतील तर बैठक कशाला घ्यायची?, उत्तरे कोण देणार?, असे प्रश्न सदस्यांनी उपस्थित केले. त्याचे उत्तर कोणीच देऊ शकले नसल्याने बैठक तहकूब करण्याची मागणी महिला सदस्यांनी लावून धरली व बैठक तहकूब करावी लागली. सदस्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे बैठक तहकूब करण्याची वेळ आली. सभापती शिवानंद पाटील यांनी ही बैठक एक-दोन दिवसात घेतली जाईल, असे सांगितले. -------------------------माढा हायस्कूलमध्ये १३ शिक्षक कमी आहेत. १६ जूनपूर्वी शिक्षण देण्याचे काय नियोजन करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार केलेल्या नियोजनाची माहिती घ्यायची होती, पण शिक्षणाधिकारीच बैठकीला नव्हते. - झुंजार भांगे, (सदस्य)------------------------आचारसंहितेच्या नावाखाली माझी गाडी काढून घेण्यात आली आहे. अशा अवस्थेतही बैठक होणार आहे का?, येत्या सोमवारपासून शाळा सुरू होणार आहेत, त्याचे कसलेच नियोजन आम्हाला समजले नाही. - - कौशल्या माळी (सभापती बार्शी)--------------------------बैठकीत शाळांचे विद्युतीकरण व अन्य विषयांवर चर्चा करायची होती. परंतु जि. प. अधिकारीच नसल्याने चर्चा होणार नव्हती. केवळ नाष्टा करण्यासाठी आलो नाहीत, म्हणून बैठक तहकूब करावी लागली.- राणी दिघे (सदस्या)-------------------------येत्या सोमवारी शाळा सुरू होणार असल्याने या बैठकीत शैक्षणिक नियोजन होईल, अशी अपेक्षा होती. परंतु शिक्षणाधिकारीच व इतर अधिकारीच बैठकीला नसल्याने बैठक तहकूब करावी लागली.- ताई मिसाळ (सभापती सांगोला)
महिला सदस्या आक्रमक; बैठक तहकूब
By admin | Published: June 10, 2014 12:41 AM