सोलापूर: केंद्राच्या सहकार खात्याने विकास सोसायट्या सक्षम करण्यासाठी गावपातळीवर १५१ व्यवसाय करण्यास परवानगी दिल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात प्रथमच ११४ खत विक्री दुकाने ( पी.एम. किसान समृद्धी केंद्र) व ६ जेनरिक मेडिकल सुरू होत आहेत. या महिनाभरात प्रस्तावांना मंजुरी देणे व आवश्यक ठिकाणचे नवे प्रस्ताव घेण्यात येतील, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले. केंद्र सरकारने देश पातळीवर सहकार खात्याची निर्मिती केली. त्यानंतर विकास सोसायट्यांमार्फत गावात सहकारी तत्वावर विविध व्यवसाय सुरू करणे. वेगवेगळे १५१ व्यवसाय करण्यास केंद्र सरकारने गावपातळीवरील विकास संस्थांना परवानगी दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यात काही विकास सोसायट्यांना सीएससी सेंटर सुरू करण्यात आली आहेत. आता विकास संस्थांच्या मागणीनुसार रासायनिक खत विक्री परवाने देण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात ११४ गावांत लायसन्स देण्यासाठी डीडीआर कार्यालयाने प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाला पाठविले आहेत. याशिवाय दोन गावात जेनरिक मेडिकल सुरू करण्यास परवाना देण्यात आला असून चार गावाचे प्रस्ताव मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.