पंढरपूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचे औचित्य साधून बुधवारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक सुवासिक फुले व हारांची आरास करण्यात आली आहे. यामुळे मंदिरात सुगंध दरवळत होता. यासाठी १८ प्रकारच्या तब्बल ९०० किलो फुलांचा वापर करण्यात आला आहे.श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने वर्षातील एकूण १५ हिंदू सणाला विविध फुलांची आरास करून मंदिराची सजावट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळेच अक्षय तृतीयेला पुणे येथील श्री लक्ष्मी फ्लॉवर अँड डेकोरेशनचे भारत दिलीप भुजबळ यांच्यासह २० कर्मचाऱ्यांनी ही सजावट केली. एकूण १३ तासांमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेसह परिवार देवता मंदिरात, गाभारा, नामदेव पायरी, पश्चिमद्वार, प्रमुख प्रवेश मार्ग येथे फुलांची आकर्षक सजावट करण्यात आल्याचे भारत भुजबळ यांनी सांगितले. पुण्यामध्येच एक दिवस अगोदर माळा, हार, गजरे, बुके अॅरेजमेंट, देवासाठी खास वैशिष्ट्यपूर्ण हार, तुरा बनविण्यात आला आहे. त्यानंतर मंगळवारी रात्री श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व परिसर देवता मंदिराची सजावट करण्यात आली. गेल्या ११ वर्षांपासून विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास करीत असल्याचे भारत भुजबळ यांनी सांगितले.१५ हिंदू सणाला होणार आकर्षक सजावटया पुढील काळात एकूण १५ हिंदू सणाला मंदिरात विविध रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात येणार आहे. त्यात आषाढी, कार्तिकी, माघ, चैत्री या वारीसह गोकुळाष्टमी, महाशिवरात्री, गुढीपाडवा, हनुमान जयंती, रामनवमी, अक्षय तृतीया, दसरा, दिवाळी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, विवाह सोहळा या सणांचा समावेश आहे. या सर्व सणाला फुलांची आरास करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.भारताची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाची सेवा करण्याची संधी मिळणे कठीण असते. मात्र मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, मला फुलांच्या आकर्षक सजावटीच्या माध्यमातून ही सेवा करण्याची संधी मिळते. ही सेवा केल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद मिळतोय.- भारत भुजबळ, भाविक, पुणे
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास, अक्षय तृतीयेनिमित्त आकर्षक सजावट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 1:07 PM