टेंभुर्णी : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते टेंभुर्णी शहरातून जाणाऱ्या १०७ कोटीच्या जून्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण कामाचे उद्घाटन होऊन पाच वर्षे लोटली. मात्र, या कामास अद्याप प्रारंभ झालेला नाही. शिवसेनेचे नेते संजय कोकाटे यांनी शुक्रवारी सोलापूर येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यांच्या खुर्चीला फेटा बांधून हार घालून अनोखे आंदोलन केले.
रखडलेल्या महामार्ग चौपदरीकरणाबाबत संजय कोकाटे यांनी दिल्लीला जाऊन मंत्री नितिन गडकरी यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांचे स्वीय सहाय्यक सुधीर देऊळगावकर यांना अनेक वेळा दूरध्वनी संपर्क साधून पाठपुरावा केला आहे. परंतू रस्त्याचे काम काही सुरू झाले नाही. अधिकाऱ्यांकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर कोकाटे यांनी गडकरी यांना नुकतेच एक निवेदन दिले. हे काम त्वरीत चालू करण्याची मागणी केली. या अनोखे आंदोलनाबाबत काेकाटे यांनी गडकरींना निवेदनाद्वारे कल्पना दिली होती.
ते शुक्रवारी सोलापूर येथे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्या कार्यालयात आले. ते उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीस फेटा बांधून हार घालून सत्कार करून गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले.
यावेळी त्यांच्यासोबत रयत क्रांतीचे प्रा. सुहास पाटील, सरपंच विजय पवार, सुधीर महाडिक उपस्थित होते .
--
२६ टेंभुर्णी
प्रकल्प संचालकाच्या खुर्चीला हार व फेटा घालून आंदोन करताना संजय कोकाटे, प्रा .सुहास पाटील ,विजय पवार व सुधीर महाडीक