सोलापूर : बदलत्या जीवनशैलीमुळे मूळव्याध आजार बळावतो. सध्याच्या या बदलत्या काळात फास्टफूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. फास्टफूड टाळून तंतूमय पदार्थांचे सेवन केल्यास मूळव्याधाला रोखणे शक्य होते, असे आंतरराष्टÑीय ख्यातीच्या गुद्रोग शल्य चिकित्सक डॉ. स्मिता वैद्य यांनी सांगितले. मूळव्याध दिनानिमित्त त्यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला.
डॉ. वैद्य या गुद्रोगावर डॉक्टरांना उपचार करण्यासाठी प्रवृत्त करतात. त्या म्हणाल्या की, शौचास साफ होणे हे आहारावर अवलंबून आहे. जो आहार अन्नरुपाने पोटात जातो तो मल रूपाने गुदमार्गाने बाहेर पडतो. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देण्याची गरज असते. आहारात भरपूर तंतूमय पदार्थाचा समावेश असायला हवा.
गव्हाच्या पिठाची चाळणी न करता केलेली चपाती, भरपूर काकडी, गाजर, कांदा, मुळा, टोमॅटो, पॉलिश न केलेल्या तांदळाचा भात, सर्व प्रकारच्या फळांच्या सालीसह सेवन, हिरव्या पालेभाज्या व फळभाज्या आहारात असाव्यात. त्याशिवाय तीन ते पाच लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. चहा-कॉफी, दारू, सिगारेट, विडी, तेलकट, मसालेदार पदार्थ आणि मांस खाल्ल्याने गुदरोग बळावतात. सर्दी, खोकला, दमा, रक्तवाढीच्या औषधांच्या सेवनाने मल घट्ट होते. त्याशिवाय मैद्याचे पदार्थ खाल्ल्यानेही शौचास त्रास होतो. यात ब्रेड, बिस्किटे, पाव, पिझ्झा, बर्गर आदी फास्टफूड यांचा समावेश होतो.
ही काळजी घ्या...
- - शौच करतेवेळी कुंथणे टाळावे
- - पुरेसा चोथायुक्त आहार घ्यावा
- - दररोज आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे
- - लठ्ठ असाल तर वजन कमी करा च्नियमित व्यायाम आवश्यक च्
- - शौचाला लागण्याची उर्मी दाबू नका
- - शौचालयात जास्त वेळ बसू नका
- - मद्यपान, सिगारेट पिऊ नका
- - अति चहा, कॉफी पिणे टाळा
खाण्यापिण्याची विचित्र सवय आणि गतिमान जीवनपद्धती हे मूळव्याध व इतर रोग होण्याचे मुख्य कारण आहे. ते टाळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. योग्य प्रमाणात पाणी पिणे, पालेभाज्या खाणे अशा चांगल्या सवयी लावायला हव्यात. आपल्याला आजार झाल्यास त्यावर त्वरित उपचार घ्यावेत. उशीर केल्यास आजारातील गुंता वाढतो.- डॉ. स्मिता वैद्य, एमबीबीएस, एम.एस., सर्जन, प्रोक्टोलॉजिस्ट