मोहोळ तालुक्यात एकूण ७६ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. यापैकी १३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने आता ६३ ग्रामपंचायतींतील १२३४ सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. मोहोळ तालुक्याचा इतिहास पाहता राष्ट्रवादीची सत्ता एकहाती असल्याचे चित्र दिसत असले तरी गावपातळीवर राष्टवादीच्याच दोन गटांत बहुतांश गावांत नातीगोती, हितसंबंध व कामाच्या माध्यमातून कोणती ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात जाणार, हे मात्र सुज्ञ मतदार ठरवणार आहेत.
दरम्यान, आपआपल्या गावात आपली प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी प्रचार करीत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.
या चुरशीच्या निवडणुकांमध्ये प्रामुख्याने पेनूर ग्रामपंचायतीत जुन्या जाणकार मंडळीच्या विरोधात सर्वपक्षीय युवकांनी एकत्र येवून आव्हान दिले आहे. त्याचबरोबरच तालुक्याच्या राजकारणात चर्चेत असलेल्या शेटफळ, नरखेड, लांबोटी, पाटकुल, टाकळी सिकंदर, बेगमपूर, कुरुल, खंडाळी, पापरी या गावांमधील नेतेमंडळीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
---
मीच खर्च करतो अन् सरपंच होतो म्हणणारे यंदा गप्प
तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरविणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या असल्या तरी शासनाने सरपंचपदाचे आरक्षण ग्रामपंचायतीच्या निकालानंतर जाहीर करणार असल्याचे सांगितल्याने आता गावच्या निवडणुकीचा सगळा खर्च मीच करणार आणि सरपंच मीच होणार असे म्हणणारे आता गप्पगुमान आपापली जागा निवडून आणण्याच्या प्रयत्नात आहेत.
----
कोरोनाची खबरदारी घेत कॉर्नर सभा
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत गावोगावी सभा, कॉर्नर सभेसह मतदारांच्या गाठीभेटीच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे. घराघरांत आता मोबाईल आल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवाराचा परिचय व आम्ही काय करणार, हे पोहोचविण्याचे काम जोरात चालू आहे. मोटारसायकल व चारचाकी गाड्यावर आपापली चिन्हे लावून तरुणाई प्रचार करीत आहे.
----