मंगळवेढा : माचणूर येथे क्रेन चालकाच्या बेफिकिरीमुळे माजी उपसरपंच पप्पू पाटील यांचा टायरखाली चिरडून मृत्यू झाला. या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या दिलीप बिल्डकॉनच्या ठेकेदार व प्रोजेक्ट मॅनेजरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक युवराज घुले यांनी केली आहे.
मंगळवेढा-सोलापूर या महामार्गाचे चौपदरीकरण करताना नागरिकांच्या वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी फारशी दक्षता न घेतल्याने या ठिकाणी आजपर्यंत अपघातात चार बळी गेले आहेत. यापूर्वी मंगळवेढा-सांगोला नाका रोडवर पुलाचे काम सुरू असताना क्रेनचालकाकडून स्लॅबचा मोठा भाग खाली निसटल्याने एका वहानचालकाचा जागीच मृत्यू झाला होता त्याचबरोबर ब्रह्मपुरी एक शेतमजूर झोपला असताना त्याच्या अंगावर टिपर गेल्याने चिरडून जागीच मृत्यू झाला होता. काही वहानचालक मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे सुसाट वाहने चालवीत असल्याच्या नागरिक, वाहनचालकाच्या तक्रारी आहेत. रस्त्यालगत गावावरील नागरिकांत सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे संबंधित प्रोजेक्ट मॅनेजर यांचे दूर्लक्ष आहे त्यामुळे दिवसेंदिवस अशा अपघाती घटनांत वाढ होत आहे.
निष्पाप माजी उपसरपंच पप्पू पाटील हे आपल्या मार्गाने रस्त्यावरून जात असताना क्रेनने पाठीमागून धडक देऊन टायर डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू झाला आहे हा अपघात एवढा भीषण होता की मेंदूचे तीन भाग झाले होते .नागरिकांच्या जिवाशी खेळ दिलीप बिल्डकॉनच्या ठेकेदाराकडुन केला जात आहे, तरी या मृत्यूप्रकरणी दिलीप बिल्डकॉनच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. मृत्युमुखी पडलेल्या पप्पू पाटील यांच्या कुटुंबियांना न्याय न मिळाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रास्ता रोको आंदोलन छेडणार असल्याचा इशारा जिल्हा संघटक युवराज घुले यांनी दिला आहे.