मोहोळ : भोयरे येथील दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या रोजगार हमी योजनेतील विहिरीचे हजेरी पुस्तक पंचायत समिती कार्यालयात सादर करण्यासाठी तक्रारदाराकडून सात हजारांची मागणी करुन साडेचार हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ग्रामसेवक मंगेश बारगळ विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
कारवाईपूर्वी लांबोटी येथे सापळा लावण्यात आला होता; मात्र संशय आल्याने ग्रामसेवकाने पळ काढला. त्यानंतर बारगळविरोधात २ जुलै रोजी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
भाेयरे येथील तीन शेतकऱ्यांच्या शेतात महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत दोन वर्षांपूर्वी विहीर मंजूर झाली होती. या विहिरीची बिले काढण्यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे सहा हजार रुपये मागणी केली होती. त्यावेळी ग्रामसेवकास सहा हजार रुपये नाईलाजास्तव दिले होते.नंतर पुन्हा ग्रामसेवक बारगळ याने २८ जून रोजी तक्रारदाराला विहिरीचे बिल काढण्यासाठी तिघांचे मिळून साडेसात हजार रुपयांची मागणी केली.
वारंवार पैशाच्या मागणीला कंटाळून तक्रारदाराने सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली. त्यानुसार पथकाने लांबोटी येथील एका हॉटेलमध्ये सापळा लावला. १७ जूनपर्यंत ग्रामसेवक हा पोलिसांच्या हाती लागला नव्हता. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांच्या पथकाने केली आहे.