पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील द. ह. कवठेकर प्रशालेत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदान केंद्रे होती. त्या ठिकाणी १ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया सुरू होती. दुपारी ३ ते ३.३० च्या सुमारास खासदार जयसिद्धेश्वर स्वामी हे मतदान केंद्रात घुसल्याची तक्रार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे मंगळवारी केली होती.
दरम्यान, द. ह. कवठेकर प्रशालेतील मतदान केंद्र क्र.१८९ चे केंद्राध्यक्ष युवराज स्वामी, क्षेत्रीय अधिकारी ह. म. बागल आणि भरारी पथक क्रमांक चारचे ए. बी. भुजबळ यांच्याकडून याबाबतचे अहवाल मागविला. त्याप्रमाणे खासदार स्वामी हे मतदान केंद्रामध्ये येऊन मतदान प्रतिनिधींशी चर्चा करून गेल्याचा अहवाल केंद्राध्यक्ष स्वामी यांनी दिला. क्षेत्रीय अधिकारी ह. म. बागल यांनीही मंगळवारी दुपारी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी द. ह. कवठेकर प्रशाला मतदान केंद्र येथे दिसल्याचे नमूद केले आहे. भरारी पथक क्रमांक चारचे ए. बी. भुजबळ यांनी देखील खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांनी द. ह. कवठेकर येथील मतदान केंद्र १८९ येथे भेट दिल्याची माहिती प्राप्त झाल्याचे त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.
दरम्यान, वरील सर्वांच्या प्राप्त झालेल्या अहवालानुसार खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय आदेशाचा भंग करून मतदान केंद्रातील मतदारांवर गैरवाजवी प्रभाव पाडण्याच्या हेतूने मतदान केंद्रात प्रवेश केल्याची खात्री झाली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध १७१ (फ), १८८ भा. दं. वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी फिर्याद मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी बुधवारी दिली. त्यानुसार खासदार डॉ. स्वामी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.