दक्षिण सोलापूर : निवडणुकीच्या काळात विनापरवाना रजेवर जाऊन कामात दिरंगाई आणि हलगर्जीपणा केल्याप्रकरणी दक्षिण सोलापूरचे निवडणूक नायब तहसीलदार ए़बीग़वारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ गवारी यांची निवडणूक नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली़ लेखी अथवा तोंडी परवानगी न घेता ते रजेवर गेले़ दि़ ९ एप्रिलपासून रजेवर गेल्याने निवडणुकीच्या प्रक्रि येवर परिणाम झाला़ त्यांच्याकडे निवडणूक काळात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या होत्या़ त्यामुळे विस्कळीतपणा आला़ सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ़ कुणाल खेमनार यांनी गवारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावून २४ तासांत खुलासा करण्याची संधी दिली़ तरीही गवारी यांनी नोटिशीची दखल घेतली नाही़ अखेर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार बाबुराव पवार यांनी दिले़ निवडणूक कामात दिरंगाई आणि हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून निवडणूक अधिनियम १९५१ अंतर्गत १३४ कलमाखाली ए़बीग़वारी यांच्यावर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ निवडणूक शांततेत पार पडली असली तरी अनेक ठिकाणी कामकाजात विस्कळीतपणा आल्याच्या तक्रारी होत्या़ परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नव्हती़ डॉ़ कुणाल खेमनार यांनी काल निवडणूक नायब तहसीलदारांवर गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखवले़ यावर प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दक्षिणच्या नायब तहसीलदारांवर गुन्हा दाखल
By admin | Published: June 11, 2014 12:35 AM