गावातील यात्रेमध्ये झालेल्या मारामारीत एकाचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेला हा मोठ्या श्रीमंत घराण्यातील होता. आरोपी म्हणून एकाच घरातील पाच जणांना गुंतविण्यात आले होते. त्यांचे वकीलपत्र देण्यासाठी त्यांचे नातेवाईक आॅफिसला आले होते. ते नातेवाईक सांगू लागले, आबासाहेब यातील एकाही आरोपीने काहीही केलेले नाही. त्यांना खोटेपणाने गुंतविले आहे. गर्दी मारामारी झाली, गोंधळामुळे व अंधारामुळे कोणी मारले हे समजत नव्हते. केवळ द्वेषापोटी यांना खोटेपणाने गुंतविले आहे. आमचे पाहुणे सरळ सज्जन प्रामाणिकपणे नोकरी करणारे. त्यांनी गावात घर बांधले, चारचाकी गाड्या घेतल्या. आमच्या पाहुण्याचे घर पुढे चालले म्हणून वाड्यावरचा पुढारी जळू लागला व तो आमच्या पाहुण्याचा द्वेष करु लागला आणि त्या दिवशी त्याला संधी मिळाली.
गावची यात्रा मोठी असायची. आजूबाजूच्या पाच-सहा गावांतील लोक प्रचंड प्रमाणात यात्रेला येत असत. त्या दिवशी खूप गर्दी झाली होती. धक्काबुक्की सुरु झाली, दगडफेक सुरु झाली, पळापळ सुरु झाली आणि वाड्यावरील पुढाºयाच्या भावाला दगडाचा वर्मी मार लागला आणि तो खल्लास झाला. तो कसा खल्लास झाला हे कोणालाच समजले नाही. परंतु झालेल्या घटनेचा गैरफायदा घेऊन द्वेषापोटी वाड्यावरील पुढाºयाने आमच्या सरकारी नोकर असलेल्या पाहुण्याची नोकरी घालविण्यासाठी त्यांना खोटेपणाने गुंतविले. केसची सर्व कागदपत्रे मी बघितली. पोलिसांनी आरोपीविरुध्द भरपूर पुरावा कोर्टापुढे सादर केला होता. यथावकाश खटल्याची सुनावणी सुरु झाली. प्रत्येक तारखेला आरोपी म्हणत, आबासाहेब आम्ही काहीही केले नाही. आम्ही निष्पाप आहोत. मी त्यांना म्हणत असे, केस फार विचित्र आहे. सर्वजण जन्मठेपेला जाण्याची शक्यता आहे. कलम तुटले व किरकोळ सजा झाली, तरीही आपल्याला यश आले असे समजायचे. पुरावा भरभक्कम असल्याने कोर्टाने सर्वांना दोषी धरले. घटना अचानकपणे घडली, आरोपींचा मयताचा खून करण्याचा हेतू नव्हता. त्यामुळे आरोपींना खुनाच्या आरोपाखाली दोषी धरता येणार नाही हा आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींची खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. परंतु दुखापत केल्याच्या आरोपावरुन कलम ३२५ प्रमाणे दोषी धरुन आरोपींना सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली.
शिक्षा जरी किरकोळ असली तरी त्या बिचाºयांची सरकारी नोकरी गेली व त्यामुळे ते सर्वजण पुन्हा गावी येऊन शेती करु लागले. बरोबर एक तपाने म्हणजे १२ वर्षांनंतर एक गृहस्थ आॅफिसला आले. त्यांना एका खून खटल्यात मला फिर्यादीतर्फे वकीलपत्र द्यायचे होते. मी कागदपत्रे बघितली. आरोपींची नावे पाहून मी चमकलोच. ज्याने आमचे सरकारी नोकर असलेल्या आरोपींना द्वेषापोटी खोटेपणाने गुंतविले होते, सजेला पाठविले होते, नोकºया घालवल्या होत्या, तोच वाड्यावरचा पुढारी या खटल्यात आरोपी क्रमांक १ होता व इतर आरोपी त्याचे घरचेच होते. त्या खटल्यातील सुनावणी सुरु झाली. त्याचे वकील युक्तिवादात टाहो फोडून सांगत होते. आमच्या आरोपींना खोटेपणाने गुंतविले आहे, ते निर्दोष आहेत. मी आरोपीच्या पिंजºयाकडे बघितले. माझी नजर जाताच त्याने मान खाली घातली. बारा वर्षांपूर्वी केलेल्या पापाचे फळ तो भोगत होता. याउलट त्याने जरी आमच्या सरकारी आरोपींना खोटेपणाने गुंतविले, नोकºया घालवल्या तरीही त्यांचे चांगलेच झाले होते. मध्यंतरी पंढरपूरला मी आमचे दिलदार व कर्णापेक्षा उदार असणारे मित्र मोहनराव देशमुख यांच्या पेट्रोलपंपावर गेलो होतो. त्यावेळी तो आमचा शिक्षा झालेला सरकारी नोकर नवीन इनोवा गाडी घेऊन पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी सहकुटुंब आला होता. तो म्हणाला विठ्ठलाच्या कृपेने सर्व काही चांगले झाले आहे. नोकरी गेल्यानंतर आम्ही कष्टाने शेती वाढवली, फुलवली. शेतीतून भरपूर उत्पन्न येत आहे. नोकरीपेक्षा दुप्पट शेतीत मिळत आहे. विठ्ठलाची कृपा आहे. मी त्यास म्हणालो वाड्यावरील पुढाºयाचे कसे चालले आहे. तो म्हणाला आता त्याचं सगळं संपलंय. केलेल्या कर्माची फळे भोगतोय. वाचक हो, लक्षात ठेवा ‘चांगले केले तर चांगलेच होते’. ‘वाईट केले तर वाईटच होते’. तो सर्वशक्तिमान सर्वश्रेष्ठ परमेश्वर वर बसून सर्व काही बघत असतो. जगातील सर्वश्रेष्ठ न्यायाधीश तोच आहे. गोस्वामी तुळसीदास रामायणात म्हणतात..., कर्म प्रधान विश्व करी राखा। जो कस करई, सो तस फल चाखा।। जैसी करणी, वैसी भरणी हेच खरे..
- अॅड. धनंजय माने (लेखक हे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत.)