सांगोला शहर व तालुक्यात कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सांगोला तहसील, पोलीस स्टेशन व नगरपरिषद सांगोला यांच्यातर्फे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी सुरू आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांनी दुय्यम कारागृहात विविध गुन्ह्यांत बंदी असलेल्या ५४ कैद्यांची शनिवारी ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांमार्फत तपासणी केली. यामध्ये एकाच वेळी तब्बल २४ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.
याची गंभीर दखल घेऊन पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्या २४ कैद्यांना कारागृहातील दोन बराकमध्ये विलगीकरण करून ठेवले होते. शनिवारी या घटनेची माहिती मिळताच, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार अभिजीत पाटील यांनी दुय्यम कारागृहाला रात्री उशिरा भेट देऊन, कैद्यांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांची काळजी घेण्याविषयी पोलीस निरीक्षकांना सूचना केल्या. त्यानुसार, सोमवारी २४ कैद्यांना कमलापूर येथील सिंहगड कोविड १९ सेंटरला हलविले.
९६ रुग्णांवर उपचार सुरू
सांगोला शहर व उपनगरात कोरोना रुग्णसंख्या ९६ वर पोहोचली आहे. यामध्ये शहर व उपनगरातील ७२ व दुय्यम कारागृहातील २४ अशा ९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील सुमारे १,३६५ दुकानदार व्यापाऱ्यांसह कामगारांची कोरोना चाचणी केली असता, १३ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तोंडाला मास्क लावणे सोशल डिस्टन्सिंग ठेवणे व सॅनिटायझरचा वापर करून सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन मुख्यधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे.