टेंभुर्णी : शहराची ओळख असलेल्या इतिहासकालीन इंदापूर वेशीच्या जीर्णोद्धाराचे काम इतिहासप्रेमी तरुणांच्या प्रयत्नातून चालू झाले आहे. अनेक वर्षे हे काम रखडले होते. यासाठी आतापर्यंत चार लाख वर्गणी जमा झाली आहे. दोन ते तीन महिन्यांत ही वेस पूर्वीप्रमाणेच दिमाखात उभा राहणार आहे.
यापूर्वी ‘लोकमत’ने या प्रश्नावर प्रकाश टाकून ग्रामपंचायत प्रशासन व लोकांचे लक्ष वेधले होते. अखेर त्यास यश आले. टेंभुर्णी शहरास ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पेशव्यांच्या काळात टेंभुर्णी येथील कीर्तनकार सदाशिवराव भाऊ माणकेश्वर यांना मानाचे स्थान होते. सवाई माधवराव पेशवे व दुसरे बाजीराव यांच्या काळात सदाशिवराव माणकेश्वर हे विश्वासू मानकरी होते. याच काळात पेशव्यांच्या बाजूने हैदराबादच्या निजामाबरोबर केलेल्या महत्त्वाच्या कामगिरीमुळे निजामाने टेंभुर्णी गाव माणकेश्वर यांना इनाम दिले होते. नंतरच्या काळात सदाशिवराव माणकेश्वर यांनी टेंभुर्णी येथे हवेली बांधली. त्यानंतर संपूर्ण टेंभुर्णी गावास तटबंदी भिंत बांधली. याचवेळी गावाच्या पूर्व व पश्चिम दिशांना भव्य वेशी बांधल्या होत्या. टेंभुर्णी गावाभोवती असलेल्या तटबंदीस १६ बुरुज व चार खिंडी होत्या.
पूर्व दिशेला असलेली वेळेस आजही सुस्थितीत आहे. परंतु इंदापूर वेशीची मागील १५ वर्षांपासून पडझड होती. वेशीचा जवळपास निम्मा भाग कोसळला होता. या वेशीतूनच दररोज हजारो लोक व जवळच असलेल्या जनता विद्यालयातील विद्यार्थी ये-जा करतात. वेशीचा राहिलेला भाग केव्हाही कोसळू शकताे.
---
कृती समितीच्या माध्यमातून प्रयत्न
मागील महिन्यात रिपाइं (ए) गटाचे जिल्हाध्यक्ष जयवंत पोळ यांनी समाज माध्यमातून या वेशीच्या जीर्णोद्धाराबाबत लोकांनी मदत करण्याचे आवाहन केले. त्यास येथील इतिहासप्रेमी तरुणांनी प्रतिसाद देत ''इंदापूर वेळेस बचाव कृती समिती'' स्थापन केली. तिच्या माध्यमातून जवळपास चार लाख रुपयांची वर्गणी जमा झाली. येथील देशमुख कंपनीचे बाळासाहेब देशमुख यांनी लाख रुपयांची भरीव मदत केली आहे. या इतिहासकालीन वेशीचे बांधकाम कडा आष्टी येथील कुशल कारागिरांमार्फत करण्यात येत आहे.
यासाठी रिपाइं (ए) गटाचे जिल्हाध्यक्ष जयवंत पोळ, भाजपाचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, ग्रामपंचायत सदस्य औदुंबर महाडिक, विलास कोठावळे, समितीचे अध्यक्ष गौतम कांबळे, मयूर काळे, गोवर्धन नेवसे, सोनाजी पाटील, विजय साळवे, बिभीषण कांबळे आदी इतिहासप्रेमी तरुण परिश्रम घेत आहेत.
---
वेशीच्या जीर्णोद्धारासाठी १८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम दोन ते तीन महिन्यांत पूर्ण होईल. पुरातत्व विभागाचे अधिकारी या कामास भेट देणार आहेत. त्यांच्याकडूनही निधीची अपेक्षा आहे.
- जयवंत पोळ
वेस बचाव समिती सदस्य
---
३१ टेंभुर्णी