सोलापूर : शिवसेनेचा सोलापूर शहर मध्य आणि करमाळा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा बुधवारी मिटला. करमाळ््यातून रश्मी बागल तर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून दिलीप माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोघांनाही बुधवारी मातोश्रीवर ए/बी फॉर्म देण्यात आले आहेत. या दोन्ही मतदारसंघात बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे.
शहर मध्य मतदारसंघातून जिल्हाप्रमुख महेश कोठे आणि माजी आमदार दिलीप माने यांनी तर तर करमाळ््यातून विद्यमान आमदार नारायण पाटील आणि रश्मी बागल यांनी उमेदवारी मागितली होती. रश्मी बागल यांनी राष्ट्रवादीतून तर दिलीप माने यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. जिल्हा संपर्क प्रमुख तानाजी सावंत हे बागल आणि माने यांच्या उमदेवारीसाठी आग्रही होते. महेश कोठे आणि आमदार नारायण पाटील यांच्यासाठी सोलापूरचे माजी संपर्कप्रमुख तथा खासदार राहूल शेवाळे यांनी ऐनवेळी उडी घेतली. मातोश्रीवर गेली तीन दिवस यावर खलबते झाली. तानाजी सावंत आणि राहूल शेवाळे यांनी चर्चा करुन बुधवारी निर्णय द्यावा, असे उध्दव ठाकरे आदेश दिले होते. पक्षाने अखेर रश्मी बागल आणि दिलीप माने यांना उमेदवारी दिली आहे.