सोलापूर : जिल्हा प्रशासन, ग्रामीण पोलिसांच्या प्रत्येक कामात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जिल्ह्यातील पोलिस पाटलांची यंदाची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे. कारण, मागील तीन महिन्यांपासून रखडलेले मानधन सोमवार १३ नोव्हेंबरपासून जमा होण्यास सुरूवात झाली आहे. सोमवारी अनेक पोलिस पाटलांच्या खात्यावर मानधनाची रक्कम जमा झाल्याचे पोलिस पाटील संघटनेकडून सांगण्यात आले.
दरम्यान, बिन पगारी फुल्ल अधिकारी..अनेक गावांचा भार तरी मानधन मिळेना या मथळ्याखाली लोकमत ने मागील दोन दिवसापूर्वी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हा प्रशासन, ग्रामीण पेालिस दलाने गंभीर दखल घेत मानधन जमा करण्याची कार्यवाही सुरू केली. जिल्ह्यात ९०० पेालिस पाटील कार्यरत आहेत. त्यांचे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांचे मानधन मिळाले नव्हते. मानधन रखडल्याचे वृत्त लोकमत मध्ये प्रसिध्द होताच जिल्हा प्रशासनाने तातडीने शासनाकडे पत्रव्यवहार करून ९०० पोलिस पाटलांचे तीन महिन्यांपासून रखडलेला १ कोटी ६८ लाख ४८ हजार रूपये इतका निधी प्राप्त निधी शुक्रवारी उपलब्ध करून घेऊन सोमवारपासून तो पोलिस पाटलांच्या खात्यावर जमा करण्यास सुरूवात केल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले.